बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावर अनेक कलाकार आपले नशीब अजमाविण्यासाठी येतात. काही यशस्वी होतात, तर काहींना रुपेरी पडद्यावरचा प्रवास अपयशामुळे अध्र्यावरच सोडावा लागतो. बॉलीवूडमध्ये आपल्या खणखणीत अभिनयामुळे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या नाना पाटेकर यांनी लोकप्रिय आणि यशस्वी अभिनेता म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. मराठी रंगभूमीवर काम करणारे नाना पाटेकर बॉलीवूडमध्ये आपल्या येण्याचे श्रेय दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिला देतात. तिने केलेल्या ‘फोर्स’मुळेच मी ‘इंडस्ट्री’त आलो असे त्यांचे म्हणणे आहे.
एन. चंद्रा यांच्या ‘अंकुश’ चित्रपटामुळे नाना पाटेकर यांना हिंदीत वेगळी ओळख मिळाली. तर ‘परिंदा’मुळे नाना बॉलीवूडमध्ये खलनायक म्हणून प्रस्थापित झाले. त्यानंतर ‘क्रांतिवीर’, ‘खामोशी’, ‘थोडासा रुमानी हो जाए’, ‘वेलकम’, तसेच इतर काही ते अगदी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अब तक छप्पन-२’ पर्यंत नाना पाटेकर यांचा बॉलीवूडमधील प्रवास सुरू आहे.
हिंदी चित्रपटातील प्रवेश स्मिता पाटील हिच्यामुळेच झाला. मी मराठी रंगभूमीवर काम करत होतो. तेथे मी खूश होतो. पण स्मिताने मी हिंदीत प्रवेश करावा म्हणून प्रयत्न केले. मला हिंदीत काम करण्यासाठी प्रवृत्त केले.
 तिनेच माझे नाव रवी चोप्रा यांना सुचविले आणि मला ‘आज की आवाज’ हा चित्रपट मिळाल्याचे नाना पाटेकर यांनी नुकतेच प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.
स्मिताने केलेल्या ‘फोर्स’मुळे मी इंडस्ट्रीत आलो. ती माझी खूप चांगली मैत्रीण होती. तिच्याबरोबर मी ‘अवाम’ आणि ‘गीद्ध’ या चित्रपटात काम केले होते. आज ती आपल्यात नाही. तिची मला नेहमीच आठवण येते, असेही नाना म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Smita patil forced nana patekar to join film industry