पाकिस्तानी अभिनेत्री सोमी अलीने वयाच्या १६व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिने ९०च्या दशकात अनेक हिट चित्रपट दिले. सोमी बॉलिवूडचा भाईजान सलमान खानची गर्लफ्रेंड होती. पण १९९९मध्ये सलमानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने इंडस्ट्रीला रामराम ठोकला. ती परदेशात जाऊन राहू लागली. आता सोमी पुन्हा एकदा चर्चेत आहे. या चर्चा तिने एका मुलाखतीमध्ये ती १४ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाल्याचे सांगितल्यामुळे सुरु झाल्या आहेत.

सोमी सध्या ‘नो मोअर टीर्यस’ या नावाचा एनजीओ चालवते. या एनजीओ अंतर्गत भारत, पाकिस्तान आणि अमेरिका या देशांमध्ये लैंगिक, मानसिक आणि शारीरिक अत्याचार झालेल्या पीडित महिलांना आधार देऊन त्यांना पुनर्वसनास मदत करते. नुकतीच सोमीने ‘नवभारत टाइम्स’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. ती १४ वर्षांची असताना तिच्यावर बलात्कार झाल्याचे तिने सांगितले.

“पाकिस्तानमध्ये जेव्हा ती ५ वर्षांची होती तेव्हा आमच्या घरात जेवण बनवण्याचे काम करणाऱ्या व्यक्तीने माझ्यावर तीन वेळा लैंगिक अत्याचार केले. जेव्हा मी ९ वर्षांची होते तेव्हा चौकीदाराने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही अमेरिकेत राहायला गेलो. तेव्हा मी १४ वर्षांची असताना तिथे एका गार्डनमध्ये १७ वर्षांच्या मुलाने माझ्यावर बलात्कार केला. वयाच्या १६व्या वर्षी मी भारतात आले. माझ्यासोबत घडलेल्या घटनांमुळे मी ‘नो मोअर टीअर्स’ हा एनजीओ चालवण्यास सुरुवात केली” असे सोमी म्हणाली.

पुढे ते म्हणाली, ‘रोज सकाळी उठल्यावर मी एकच विचार करते की आज कोणाचे तरी आयुष्य वाचवूया. यापेक्षा अधिक चांगले आयुष्य जगण्याचे अजून काय कारण असू शकते?’