बॉलिवूड गायिका कनिका कपूरला काही दिवसांपूर्वी करोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले. त्यानंतर चित्रपटसृष्टीमध्ये खळबळ उडाली आहे. कनिकाने लंडनहून आल्यावर तिला करोनाचा संसर्ग झाल्याचे लपवल्याचे आरोप अनेकांनी तिच्यावर केले. अशा परिस्थितीमध्ये अभिनेत्री सोनम कपूरने तिला पाठिंबा देत ट्विट केले. तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.

सोनमने कनिकाला पाठिंबा देत ‘कनिका ६ मार्चला भारतात परती. तेव्हा भारतात आयसोलेशन सुरु झाले नव्हते पण लोकं होळी मात्र खेळत होते’ असे ट्विटमध्ये म्हटले होते. तिचे हे ट्विट पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

एका नेटकऱ्याने तिला तू ट्विटच करु नकोस असा सल्ला दिला आहे.

काही दिवसांपूर्वी कनिका लंडनला गेली होती. त्यानंतर तिने करोना चाचणी करताच ती पॉझिटीव्ह आल्याची माहिती तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे लखनऊमध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. करोनाची चाचणी करण्यापूर्वी तिने एका पार्टीला हजेरी लावली होती. ही पार्टी काँग्रेसचे जतिन प्रसाद यांचे सासरे आदेश सेठ यांनी ठेवली होती. या पार्टीला राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा मुलगा दुष्यंत सिंह, उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह, संजय मिश्रा आणि इतर दिग्गज उपस्थित होते.

करोनाची चाचणी पॉझिटीव्ह आल्यामुळे लखनऊमध्ये तिला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. पण तिने करोनाचा संसर्ग झाल्याचे सर्वांपासून लपवल्याचा आरोप अनेकांनी तिच्यावर केले. कनिकाने ‘बेबी डॉल’, ‘बीट पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. तसेच तिने काही रिअॅलिटी शोमध्ये परीक्षक म्हणूनही काम केले आहे.