अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता सोनू सूद भारतीयांसाठी एका सुपरहिरो प्रमाणे काम करत आहे. लॉकडाउनच्या काळात त्याने केलेले मदत कार्य संपूर्ण देशाने पाहिले आहे. सोनू सूदने आजवर लाखो नागरिकांची मदत केली आहे. मग ते स्थलांतर करणाऱ्या मजुरांसाठी असो किंवा लॉकडाउनमुळे पोटाला उपवास घडणाऱ्या गरजूंसाठी असो सोनू सूद सर्वांच्या मदतीला धावून आला आहे. दिवसाला सोनू सूदला मदत मागणारे लाखो मेसेज आणि फोन येत असतात. आता हे मेसेज सोनू सूदच्या दुधवाल्यालाही येऊ लागले आहेत.
सोनू सूदने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुधवाल्याचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ स्वत: सोनू सूदने रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये दुधवाले, गुड्डू बोलताना दिसत आहेत. अनेकजण मदतीसाठी कोणत्याही वेळी फोन आणि मेसेज करतात असे गुड्डू बोलताना दिसत आहेत. सोनू सूदशी बोलत असतानादेखील गुड्डू यांना एक फोन आलेला आहे.
आणखी वाचा : लॉकडाउनमुळे ‘मिर्जापूर’मधील अभिनेता रस्त्यावर विकतोय ‘रामलड्डू’? फोटो व्हायरल
सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून करोना झालेल्या लोकांची मदत करत आहे. ऑक्सिजन, रेमडेसिविर याचा तुटवडा जाणवत असताना गरजू रुग्णांना त्याचा तातडीने पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहे. लोकांच्या मदतीसाठी त्याने एनजीओ देखील सुरु केले आहे. या एनजीओ अंतर्गत तो करोना रुग्णांना मदत करताना दिसतो.