‘स्पायडरमॅन होमकमिंग’ या सुपरहिरोपटामुळे नावारूपास आलेला अभिनेता टॉम हॉलंड आज हॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय बालकलाकार म्हणून ओळखला जातो. स्पायडरमॅन या व्यक्तिरेखेने आपले आयुष्यच बदलून टाकले असे मानणाऱ्या या अभिनेत्याला स्पायडरमॅनव्यतिरिक्त ‘एक्स मेन’ या चित्रपट मालिकेत काम करण्याची इच्छा आहे, असे त्याने एका मुलाखतीत सांगितले. तसेच ‘वुल्वरीन’ हा त्याचा सर्वात आवडता सुपरहिरो असून ते पात्र साकारणारा ह्य़ू जॅकमन हा त्याचा आवडता अभिनेता आहे. कॉमिक, कार्टून आणि चित्रपटांतून त्याच्या बालमनावर मोहिनी घालणाऱ्या या सुपरहिरोमुळेच त्याला अभिनेता बनण्याची स्वप्ने पडू लागली. जॅकमनच्या अभिनय शैलीचे अनुकरण करत टॉमने अभिनय सृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले. आणि आज तो एक यशस्वी अभिनेता म्हणून नावारूपाला आला आहे. तसेच त्याने स्पायडरमॅन चित्रीकरणादरम्यान आलेले काही अनुभवही चाहत्यांसमोर मांडले. पीटर पार्कर हे पात्र त्याच्याआधी टॉबी मॅग्वायर व अँण्ड्रयमू गारफिल्ड या दोन अनुभवी कलाकारांनी समर्थपणे साकारल्यामुळे प्रेक्षक स्पायडरमॅन पाहताना टॉमची तुलना आधीच्या कलाकारांबरोबर करणार याची जाणीव त्याला होती. त्यामुळे काम करताना त्यांच्याइतकाच उत्तम अभिनय करण्याचे दडपण त्याच्यावर होते. पण सुपरस्टार रॉबर्ट डाऊनी ज्युनिअर व दिग्दर्शक जॉन वॉट्स यांच्या प्रोत्साहनामुळे मला स्पायडरमॅन ही व्यक्तिरेखा उत्तमपणे साकारता आली, असे तो म्हणतो. सध्या तो ‘अॅव्हेंजर्स : इन्फिनिटी वॉर’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. पण भविष्यात संधी मिळाली तर वुल्वरीन या व्यक्तिरेखेसाठी आवर्जून प्रयत्न करेन, असे त्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Oct 2017 रोजी प्रकाशित
स्पायडरमॅनला पडतात ‘एक्स मेन’ची स्वप्ने
‘वुल्वरीन’ हा त्याचा सर्वात आवडता सुपरहिरो
Written by मंदार गुरव
Updated:

First published on: 08-10-2017 at 01:20 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Spiderman x men wolverine hollywood katta part