मराठी चित्रपट आणि मालिकांद्वारे प्रसिद्ध अभिनेत्री स्पृहा जोशी हिने नेहमीच आपल्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर चालवली आहे. तर ‘लोपामुद्रा’ या आपल्या काव्य संग्रहानेही ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतेय. तिचा लोपामुद्रा हा काव्यसंग्रह इतका गाजला की तिच्या एका चाहतीने थेट अहमदनगरहून तिच्यासाठी एक खास भेट आणली. तिच्या चाहतीने लोपामुद्रा हा काव्यसंग्रह स्वतःच्या हाताने मोडी भाषेत लिहून तिला दिला. स्पृहाने तिच्या फेसबुक अकाऊंटवरुन याबद्दल अधिक माहिती दिली.

तिने फेसबुकवर लिहिले की, ‘परवाची गोष्ट. अहमदनगरहून गिरीजा दुधाट नावाची ही छोटी मैत्रीण मला भेटायला आली. बरेच दिवस फोनाफोनी झाल्यावर फायनली आम्ही भेटलो. आणि तिने मला चकितच केलं. या बडबड्या, उत्साही मुलीने माझा ‘लोपामुद्रा’ हा काव्यसंग्रह अख्खाच्या अख्खा मोडी लिपीत लिहून काढलाय. स्वतःच्या हाताने! काय बोलावं तेच सुचत नव्हतं. इतिहासजमा होत चाललेली ‘मोडी लिपी’ टिकवून ठेवण्याच्या जिद्दीने गिरीजा वाटचाल करतेय. तिला पुढे जाऊन आर्कियोलॉजीचा अभ्यास करायचाय. तिला मनापासून शुभेच्छा. आणि थँक यू गिरीजा या सुंदर गिफ्टसाठी. हे गिफ्ट आणि त्यामागच्या तुझ्या भावना खरोखरच अनमोल आहेत.!’

काही दिवसांपूर्वीच स्पृहा जोशीचा तिच्या चाहत्यांसह ट्विटरवर ट्विटरकट्टा रंगला होता. तेव्हा तुला बालपणी काय होण्याची इच्छा होती, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर आपल्याला बस कंडक्टर होण्याची इच्छा होती असे स्पृहाने सांगितले. विशेष म्हणजे यामागचे तिचे कारण जाणून तुम्हीही हसाल. या प्रश्नाचे उत्तर देताना स्पृहा म्हणाली की, मला बालवयात असताना बस कंडक्टर बनण्याची इच्छा होती. कारण त्यांच्या बॅगेत खूप पैसे असतात.

स्पृहा जोशीने उमेश कामतसोबत ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ हे नाटक केले. तसेच, तिने ‘मोरया’, ‘अ पेइंग घोस्ट’, ‘लॉस्ट अॅण्ड फाउंड’ या सिनेमांमध्येही काम केले आहे.