कलाविश्वामध्ये आतापर्यंत अनेक शूरवीरांवर आधारित चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. अलिकडेच ‘पानिपत’, ‘फत्तेशिकस्त’, ‘फर्जंद’ या चित्रपटांमधून इतिहास उलगडण्यात आला. त्याच्यासोबतच त्यांच्या शूर मावळ्यांचंही या चित्रपटांमधून दर्शन झालं. त्यानंतर आता लवकरच बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. चित्रपट दिग्दर्शक अभिजीत देशपांडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली.

‘पावनखिंड’ म्हटलं, डोळ्यासमोर येतं ते बाजीप्रभू देशपांडे यांनी स्वराज्यासाठी दिलेली प्राणांची आहुती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेवेसाठी कायम तत्पर असणाऱ्या या लढवय्या मावळ्यावर आधारित लवकरच चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार असून हा चित्रपट २०२० मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

बाजीप्रभू देशपांडे यांच्या जीवनावर आधारित आगामी चित्रपटाचं नाव ‘पावनखिंड’ असं आहे. बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू अन् त्यांच्या मावळ्यांनी सिद्दी मसूदच्या सैनिकांना जिथे रोखून धरलं ती पावनखिंड. रात्रभर चालून दमलेले हे शूरवीर अविश्रांत श्रमानंतरसुद्धा पुढे सलग १०-१२ तास शत्रूशी झुंजले. त्यांच्या राजासाठी आणि स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:च्या जीवावर उदार होऊन गजापूरच्या खिंडी लढविली.  ही गजापूर खिंड म्हणजेच पावनखिंड. त्यामुळे त्यांच्या शैर्याची गाथा साऱ्यांसमोर यावी यासाठी या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे.


‘गजापूर’च्या खिंडीलाच ‘घोडखिंड’ असेही म्हटलं जातं. याच खिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी यांनी सिद्धीच्या सैन्याला रोखून ठेवलं होतं. हजारोंच्या सैन्याला रोखून धरलेल्या बाजीप्रभू आणि त्यांच्या मावळ्यांनी मोठ्या हिंमतीने १०-१२ तास खिंड लढविली आणि पराक्रमाची शर्थ केली. मराठी सैनिकांच्या अभूतपूर्व अशा पराक्रमाने आणि बाजींसारख्या स्वराज्यनिष्ठांच्या पवित्र रक्ताने ‘घोडखिंड’ पावन झाली म्हणूनच तिचे नाव ‘पावनखिंड’ झाले.

दरम्यान, ‘आणि.. डॉ. काशीनाथ घाणेकर’ या चित्रपटाचेच दिग्दर्शक आणि निर्माते ‘पावनखिंड’चे दिग्दर्शन आणि निर्मिती करणार आहे. ‘आणि..डॉ. काशीनाथ घाणेकर’ चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांनी केली होती. तर दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केलं होतं. अद्यापतरी या चित्रपटाविषयी फारशी माहिती समोर आली नसून यात कोणकोणत्या कलाकारांची वर्णी लागणार हेदेखील स्पष्ट झालेलं नाही.