मराठी सिनेसृष्टीत आशालता या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांचे करोनामुळे सातारा येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या ७९ वर्षांच्या होत्या. आशालता यांच्या निधनाच्या वृत्ताने मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेता सुबोध भावेनं सोशल मीडियावर पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘प्रदीर्घ काळ स्वतःच्या अभिनयाने संगीत रंगभूमी, चित्रपट आणि मालिका या सर्वच ठिकाणी लीलया काम करणारी आमच्या सर्वांची ‘माँ’, आशाताई आम्हाला पोरकं करून गेल्या. आशाताई तुला भावपूर्ण श्रद्धांजली. मित्रांनो कृपया काळजी घ्या,’ असं सुबोध भावेनं लिहिलं. यावर्षी फेब्रुवारीमध्ये आशालता यांना शेवटचं प्रत्यक्ष भेटलो तेव्हाचा हा फोटो असल्याचं त्याने पोस्टमध्ये सांगितलं.

आशालता या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या शूटिंगसाठी साताऱ्यात आल्या होत्या. याच ठिकाणी त्यांना करोनाची लागण झाल्याने अस्वस्थ वाटू लागले होते. त्यामुळे त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.

आशालतांनी आतापर्यंत मराठी आणि हिंदी अशा सुमारे १०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. ‘उंबरठा’, ‘सूत्रधार’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘वहिनीची माया’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते. त्या मूळच्या गोव्याच्या असून त्यांनी कोकणी आणि मराठी चित्रपटांच्या माध्यमातून अभिनयाला सुरुवात केली.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Subodh bhave emotional post for veteran actress ashalata wabgaonkar passes away ssv