स्वाती आणि श्रीधर यांच्यातील हळुवार प्रेमकहाणी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चिन्मय मांडलेकर लिखित आणि मुळाक्षर प्रॉडक्शन निर्मित ‘चंद्र आहे साक्षीला’ ही मालिका ११ नोव्हेंबरपासून सुरू होतेय. सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर प्रेक्षकांना ही मालिका पाहता येईल. या मालिकेत श्रीधरची भूमिका सुबोध भावे साकारणार असून स्वातीच्या भूमिकेत ऋतुजा बागवे दिसणार आहे.
मालिकेच्या कथेतील स्वाती ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली अतिशय सोशिक, साधी सरळ अशा स्वभावाची आहे. फसवणुकीवर उभं असलेलं नातं पत्त्याच्या बंगल्यापेक्षा तकलादू असतं, असं तिचं म्हणणं आहे. वयाच्या चौतिसाव्या वर्षीदेखील स्वाती अविवाहित आहे आणि नकळतपणे तिच्या आयुष्यात श्रीधर येतो. या दोघांमधील प्रेम हळूहळू फुलू लागतं आणि दोघं एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण या दोघांचं आयुष्य नक्की कोणाच्या आणि कोणत्या रहस्याने पूर्णपणे बदलून जाणार, स्वाती आणि श्रीधरच्या या पिक्चर परफेक्ट जगात नक्की काय घडणार याची उत्कंठावर्धक कथा या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.