लॉकडाउनच्या काळात लोकांना घरी बसून ९०च्या दशकातील दूरदर्शन वाहिनीवरील लोकप्रिय मालिका पुन्हा एकदा पाहता आल्या. या मालिकांमधील ‘रामायण’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर जादू केली. या मालिकेसोबतच त्यातील कलाकार सोशल मीडियावर चर्चेत आले. या कलाकारांनीसुद्धा सोशल मीडियावर मालिकेतील काही जुन्या आठवणी सांगितल्या तर काहींनी जुने फोटो पोस्ट करत त्या आठवणींना उजाळा दिला. रामायणात लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनिल लहरी यांनी नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत सेटवरील धमाल गंमत सांगितली.
या फोटोमध्ये सुनिल लहरींसोबत रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल आणि एक साधू दिसत आहेत. सुनिल लहरी यांनी साधूची भूमिका साकारणाऱ्या त्या व्यक्तीसोबत सेटवर गमतीशीर प्रँक केला होता. तीच आठवण त्यांनी कॅप्शनमध्ये सांगितली. ‘या फोटोला पाहून मला त्या साधूंची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यासोबत केलेला प्रँक आठवला. त्यांच्या हातातील बाणाला प्लास्टिकची खोटी पाल चिटकवली होती आणि त्याला स्पर्श करताच ते ४४० व्होल्टचा करंट लागल्याप्रमाणे त्यांनी उडी मारली होती. हातातील सर्व बाण खाली फेकून ते लांब उभे राहिले होते’, असं लिहित त्यांनी हसण्याचे इमोजी पोस्ट केले.
रामायण मालिकेत लक्ष्मण ही भूमिका साकारणारे सुनिल लहरी आता ५९ वर्षांचे आहेत. सोशल मीडियावर त्यांचे बरेच जुने फोटो व्हायरल झाले होते. सुनिल लहरी यांनी रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेतच नव्हे तर ‘विक्रम वेताळ’ या मालिकेत देखील काम केले आहे. १९९० रोजी ‘परम वीर चक्र’मध्ये काम केले होते. त्याआधी त्यांनी १९८० मध्ये ‘द नेक्सेलाइट्स’ या चित्रपटात काम करत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यासोबत भूमिका साकारली होती. सुनिल यांनी अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.