दाक्षिणात्य सुपरस्टार सूर्या याच्या बहुप्रतिक्षीत आणि बहुचर्चित ठरत असलेल्या सोराराय पोत्रू या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून या चित्रपटाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. त्यातच आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
कॅप्टन जी. आर. गोपीनाथ यांच्या ‘सिंपली फ्लाय: अ डेक्कन ओडिसी’ या पुस्तकावर या चित्रपटाची कथा आधारित असून सूर्या, मोहन बाबू, अपर्णा बालमुरली आणि परेश रावल हे महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. कमी खर्चात विमानसेवा सुरु करताना आलेल्या अडचणी, त्यांनी केलेला संघर्ष या सगळ्यावर या चित्रपटात भाष्य करण्यात येणार आहे.
दरम्यान, सोराराय पोत्रू हा चित्रपट येत्या ३० ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. मात्र, काही कारणास्तव या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आहे. त्यामुळे हा चित्रपट आता १२ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.