दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत अभिनेत्री अंकिता लोखंडेने त्याची कथित गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीला सडेतोड उत्तर दिलं आहे. सुशांतला विमानात बसण्याची भीती वाटायची असं रियाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं. अंकिताने पोस्ट केलेल्या व्हिडीओत सुशांत कोणत्याही भीतीशिवाय विमान उडवताना पाहायला मिळत आहे. अंकिता सुशांतची एक्स गर्लफ्रेंड आहे. सुशांत व अंकिता जवळपास सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

सुशांतचा विमान उडवतानाचा व्हिडीओ पोस्ट करत अंकिताने लिहिलं, ‘हे क्लॉस्ट्रोफोबिया claustrophobia आहे का? तुला नेहमीच विमान उडवायचं होतं आणि तू ते करून दाखवलंस. आम्हाला तुझा अभिमान आहे.’ ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत रिया म्हणाली होती, “विमानात बसण्याआधी सुशांत modafinil नावाचं औषध घ्यायचा. कारण त्याला विमानात बसण्याची भीती वाटायची. आम्ही युरोपला जाताना त्याने ते औषध कोणत्याही प्रीस्क्रिप्शनशिवाय घेतलं होतं. जेव्हा आम्ही पॅरिसला पोहोचलो, तेव्हा तीन दिवस तो रुममधून बाहेर पडला नव्हता.”

१४ जून रोजी सुशांत मुंबईतल्या राहत्या घरी मृतावस्थेत आढळला. त्याच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सध्या सीबीआय करत आहे. युरोप ट्रीप दरम्यान मला सुशांतच्या मानसिक आजाराबद्दल समजले असे रियाने इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.