ऐन उमेदीच्या काळात अभिनेता सुशांत सिंह राजपूत या ३४ वर्षीय अभिनेत्याने आत्महत्या करुन त्याचं जीवन संपवलं. मनाला चटका लावून जाणाऱ्या या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु त्याने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना आणि जवळच्या मित्रांना प्रचंड धक्का बसला आहे. म्हणूनच अभिनेत्री भूमि पेडणेकरने सुशांतच्या आठवणीत काही गरजू कुटुंबांची पोटं भरण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलिकडेच भूमिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने ५५० जणांना जेवण उपलब्ध करुन देणार असल्याचं म्हटलं आहे. सुशांत एक चांगला मित्र होता. त्यामुळेच त्याच्यासाठी मी कार्य करणार असल्याचं तिने म्हटलं आहे.

“माझा मित्र सुशांत याच्या आठवणीत मी ‘एक साथ’ या फाऊंडेशनच्या माध्यमातून ५५० गरीब कुटुंबांमध्ये अन्नदान करण्याचा निर्धार केला आहे. ज्यांना या काळात मदतीची आणि प्रेमाची गरज आहे अशांसाठी काही तरी करुयात”, असं भूमिने तिच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, यापूर्वी सुशांतचा मित्र बॉलिवूड दिग्दर्शक अभिषेक कपूर आणि त्याची पत्नी प्रज्ञा कपूर यांनीदेखील ३ हजार ४०० कुटुंबांमध्ये अन्नवाटप केलं होतं. प्रज्ञाच्या ‘एक साथी’ या संस्थेअंतर्गत त्यांनी ही मदत केली होती. त्याच संस्थेअंतर्गत भूमिदेखील गरजुंमध्ये अन्नदान करणार आहे. सुशांत आणि भूमि एकमेकांचे चांगले मित्र होते. ‘सोन चिडिया’ या चित्रपटात त्यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sushant singh rajput demise bhumi pednekar pledges to feed 550 underpriviledged families ssj