बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ हा अखेरचा ठरलेला चित्रपट २४ जुलै रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक जण सुशांतच्या आठवणीत भावूक झाले आहेत. अनेक जण सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त करत आहेत. यामध्येच अंकिता लोखंडेच्या अश्रूंचा बांधदेखील फुटला असून तिने ट्विटरच्या माध्यमातून तिच्या भावनांना वाट मोकळी केली आहे.

सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. परंतु, हे यश पाहण्यासाठी सुशांत आपल्यात नसल्याची जाणीव चाहत्यांना आणि सुशांतच्या कुटुंबीयांना सतत होत असल्यामुळे ते भावूक झाले आहेत. या अंकिताने मोजक्या शब्दांत सुशांतप्रतीचं प्रेम, त्याच्या आठवणीने व्याकूळ झालेली तळमळ व्यक्त केली आहे.

‘पवित्र रिश्तापासून दिल बेचारा तक. एक आखिरी बार..’, असं म्हणत अंकिताने दिल बेचारामधील एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिची ही पोस्ट पाहिल्यानंतर अनेकांनी तिच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करत तिचं सांत्वन केलं आहे.

दरम्यान, सध्या अंकिताची ही पोस्ट चांगलीच चर्चेत येत आहे. तिच्यासोबतच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी हा चित्रपट पाहिल्यानंतर सुशांतविषयी, त्याच्या कामाविषयी आणि या चित्रपटाविषयी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.