सध्याच्या घडीला मराठी रंगभूमी ही सातत्यपूर्ण प्रयोगासाठी ओळखली जाते. गेल्या वर्षी फार कमी प्रयोगशील नाटकं आली, पण गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या नववर्षांतील काही महिन्यांमध्ये आपल्याला प्रयोगशील नाटकं पाहण्याचा योग येणार आहे. या वर्षांत ‘सुयोग’ नाटय़संस्था तीन नाटकं घेऊन येणार आहे. यापैकी दोन नाटकं एकांकिकेवर आधारित आहेत. ‘अनन्या’ आणि ‘श्यामची आई’ या त्या दोन एकांकिका. प्रणीत कुलकर्णी यांचं लेखन आणि दिग्दर्शन असलेलं ‘सुरक्षित अंतर ठेवा’, लेखक-दिग्दर्शक संतोष वाझे यांचं ‘लेस्बिअन’, रवी भागवते लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘क्वीन मेकर’ ही नवी कोरी प्रयोगशील नाटकं रसिकांच्या भेटीला येत्या काही दिवसांमध्ये येणार आहेत.

अभिनेत्री स्पृहा जोशीला ज्या एकांकिकेने खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली ती म्हणजे ‘अनन्या.’ प्रताप फडने रुईया महाविद्यालयाकडून ही एकांकिका केली होती. त्यावेळी ती फारच गाजली होती. यावेळी त्याचे नाटय़ रूपांतर आणि दिग्दर्शनही तोच करणार आहे. ‘अनन्या’ ही एक अशी गोष्ट आहे की तुमच्यावर कितीही वाईट परिस्थिती आली तरी ती सकारात्मकरीत्या जगायला प्रेरणा देते. एकांकिकेचे नाटक करताना निश्चितच काही गोष्टी बदलल्या आहेत. एकांकिकेमध्ये वेळेच्या अभावी काही गोष्टी कमी वेळात कराव्या लागल्या होत्या, या साऱ्या गोष्टींना फुलवायला नाटकात वाव मिळतो आहे. तिच्या आयुष्यातील नाती दाखवण्यासाठी मला थोडा जास्त अवधी नाटकात मिळाला आहे. जी धडधाकट माणसं आहेत ती एका परिस्थितीपुढे शरण जातात, पण जी मुलगी हे सारं भोगते ती कसा लढा देते, अशी ही संहिता आहे. व्यावसायिक नाटक करताना काही पात्रांची संख्या कमी केली असून मे महिन्यात हे नाटक रंगभूमीवर येऊ शकेल’, असं प्रतापने या नाटकाविषयी सांगितलं.

‘सुयोग’चं या वर्षी एक लोकनाटय़ येणार असून त्यामध्ये मकरंद अनासपुरे काम करणार आहेत. हे नाटक आजच्या प्रश्नांवर भाष्य करणारं असेल, अशी माहिती मिळत असली तरी ते अजून मूर्त स्वरूपात आलेलं नाही. गेल्या वर्षी प्रेक्षकांची मनं जिंकली ती ‘श्यामची आई’ या एकांकिकेने. या एकांकिकेचं नाटक जवळपास ऑगस्ट महिन्यापर्यंत रंगभूमीवर येण्याची शक्यता आहे. सुधीर भट यांच्या जन्मतिथीला म्हणजेच १३ जूनला हे नाटक रंगभूमीवर आणण्याचा प्रयत्न असेल. ‘आई आणि मुलगा हे एक वैश्विक नातं आहे. आई प्रत्येक मुलाची काळजी घेत असते. पण या संहितेमध्ये त्यावर आधारित प्रयोग केला आहे. एकांकिका करत असताना आम्हाला फारच चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे एकांकिकेचे नाटक बसवताना जबाबदारी वाढली आहे. एकांकिका वेळेत बसवावी लागते त्यामुळे काही गोष्टी राहून जातात, पण नाटक करताना तुम्हाला मिळणाऱ्या अवधीत सारं काही व्यवस्थित बसवता येतं. त्यामुळे एकांकिका अणि नाटक यामध्ये फरक नक्कीच पाहायला मिळेल, दिग्दर्शक स्वप्निल बारस्कर एकांकिका ते नाटक या प्रवासाबद्दल बोलत होता.

‘अष्टविनायक’ आणि ‘जय मल्हार’ या नाटय़संस्थेचं ९ एप्रिलपासून ‘सुरक्षित अंतर ठेवा’ हे वेगळ्या मांडणीचं नाटक रंगभूमीवर येत आहे. लेखक आणि दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णी यांनी आपल्या नाटकाचा विषय सांगितला नसला तरी या नाटकात प्रेक्षक न्यायाधिशाच्या भूमिकेत असतील, हे मात्र आवर्जून सांगितले. ‘या नाटकात न्यायालयीन लढाई दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. हे आजच्या पिढीसाठी उपयुक्त नाटक आहे. कारण हे नाटक व्हच्र्युअल जगात घडतं. या नाटकाच्या मध्यंतराला आणि शेवटी प्रेक्षक मतदान करतील. हा एक वेगळा प्रयोग करायचे आम्ही ठरवले असून प्रेक्षक पूर्णपणे या नाटकात गुंतून राहतील आणि ते या नाटकाचा एक भाग होतील. या नाटकात टेक्नो सेट असेल. त्याचबरोबर गाणीही रेकॉìडग केलेली न वापरता रंगमंचावर गाणी गायली जाणार आहेत. जर तुम्हाला आयुष्य सुखात घालवायचं असेल तर ‘सुरक्षित अंतर ठेवा’, हाच संदेश नाटकातून देण्यात येणार आहे,’ असे कुलकर्णी सांगत होते.

‘लेस्बिअन’ हे एक प्रयोगशील नाटक मे महिन्याच्या अखेरीस येणार आहे. या नाटकाचा विषय आंबट शौकिनांसाठी नाही, असं लेखक-दिग्दर्शक संतोष वाझे आधीच स्पष्ट करतात. ‘शरीर बदलल्यावर स्वभाव बदलतो का, हा या नाटकाचा मूळ विषय आहे. ‘ट्रान्स जेंडर’ या विषयावर हे नाटक आधारित आहे. शस्त्रक्रिया करून लिंगबदल केला जातो, पण त्यामुळे तो माणूस, त्याचे विचार, राहणं बदलतं का, या विषयावर हे नाटक प्रकाशझोत टाकतं. एका कुटुंबाला मुलगी हवी असते, पण घरात मुलगा जन्माला येतो. हा मुलगा जवळपास मुलीसारखाच वागत असतो. त्यामुळे लिंगबदल केल्यावर जर चांगलं आयुष्य जगता येत असेल तर हा बदल करावा, असं कुटुंबीयांचं मत असतं आणि हा बदल घडतो. पुरुषाची स्त्री होते. त्यानंतर काय घडतं, हे या नाटकात दाखवलं जाणार आहे. हे मराठी रंगभूमीवरील पहिलं मिंग्लिश नाटक असेल. इंग्रजी आणि मराठी या दोन भाषांमध्ये हे नाटक आहे. फक्त मराठीपुरतं मला हे नाटक मर्यादित ठेवायचं नाही. सुशिक्षित वर्गाने या नाटकाकडे वळावं, असं मला वाटतं. नाटकाचं नाव पाहून लोकांच्या मनात काही प्रश्न असतील, त्या प्रश्नाचं निरसन या नाटकामध्ये नक्कीच होईल. वेगळा प्रयोग करायला मला आवडतो, त्यामुळे हे नाटक करायचं मी ठरवलं. मे महिन्याच्या अखेरीस हे नाटक रंगभूमीवर येईल’, असं वाझे यांनी सांगितलं.

रवी भगवते लिखित आणि राजन ताम्हाणे दिग्दर्शित ‘क्वीन मेकर’ हे नाटक एप्रिल महिन्याच्या मध्यावर रंगभूमीवर येत आहे. आतापर्यंत दिग्दर्शनाचा चांगलाच अनुभव असलेले ताम्हाणे या नाटकाविषयी भरभरून बोलत होते. ‘हे एक नव कोरं आणि आजच्या पिढीचं नाटक आहे. रवी भगवते यांचं मराठी रंगभूमीवरचं हे पहिलंच नाटक असलं तरी राज्य नाटय़ स्पर्धेत त्यांनी यापूर्वी बरीच नाटकं लिहिली आहेत. हे नाटक युवा पिढीच्या मूळ प्रश्नाला हात घालणारं आहे. आजची पिढी लग्न करायला तयार झाली तर त्यामध्ये बऱ्याच अटी असतात. यामधील काही अटी एकमेकांना पूर्णपणे पटत नसल्या तरी त्यावेळेची गरज म्हणून हा पर्याय ते स्वीकारतात. काळानुसार ही अट बायकोला बदलावीशी वाटते आणि काडीमोड होतो. त्यानंतर तो दुसरं लग्न करतानाही आपली तीच अट कायम ठेवतो. ही अट नेमकी कोणती आणि नाटकात पुढे काय होतं, हे काही दिवसांत नाटक रंगभूमीवर आल्यावरच समजू शकेल,’ असं ताम्हाणे सांगत होते.

रंगभूमीला मरगळ आली आहे असं वाटत असतानाच येत्या काही दिवसांमध्ये या प्रयोगशील नाटकांची मेजवानी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. फक्त नाटकाच्या नावावरून ते बघायचं किंवा नाही, हे ठरवू नका. नाटक पाहायला जा आणि प्रयोगांचा आनंद लुटा.