आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या दोन महिन्यांपासून तापसी या चित्रपटातील भूमिकेसाठी तयारी करतेय. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विना हेल्मेट बाईक चालवताना तापसीला दंड भरावा लागला. त्याचा फोटो तापसीने इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे.
बाईक चालवतानाचा पाठमोरा फोटो तापसीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलं, ‘विना हेल्मेटसाठी दंड भरण्यापूर्वीचा फोटो’. आकाश खुराना दिग्दर्शित ‘रश्मी रॉकेट’ या चित्रपटात तापसी एका धावपटूची भूमिका साकारत आहे. या शूटिंगदरम्यानचे काही फोटो तापसी सोशल मीडियावर शेअर करतेय.
आणखी वाचा : जय बच्चन यांचे ते शब्द ऐकून ऐश्वर्याच्या डोळ्यात आलं पाणी; पाहा व्हिडीओ
या भूमिकेसाठी तापसी खूप मेहनत घेत असून सेटवरही तिच्यासोबत पाच आहारतज्ज्ञ, फिजिओथेरपिस्ट, ट्रॅक ट्रेनर, अॅथलेटिक्स कोच आणि जिम ट्रेनर अशी टीम असते. आपल्या जिद्दीच्या व मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचणाऱ्या एका धावपटूची भूमिका ती साकारतेय.
तापसीच्या हातात सध्या बरेच प्रोजेक्ट्स असून नुकतंच तिने आनंद एल राय दिग्दर्शित ‘हसीन दिलरुबा’ या रोमॅण्टिक थ्रिलर चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं. त्यानंतर ती ‘लूप लपेटा’, ‘रन लोला रन’ या चित्रपटांमध्येही झळकणार आहे. अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘थप्पड’ या चित्रपटातील तिच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं.