प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेली अनेक वर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. सासू-सुनांची भांडणं, त्यांच्यातील कट कारस्थानं अशीही कोणतीही भानगड न दाखवता निखळ मनोरंजनाचा आनंद देणारी अशी ही मालिका. या मालिकेतील गोकुळधाम सोसायटीत राहणारे जेठालाल, दयाबेन, भिडे, माधवी, कोमल, बबिता, अंजली ही सर्वच पात्र खूप प्रसिद्ध आहेत. पण, त्यातील जेठालाल आणि बबिता हे दोन पात्र खूपच रंजक आहेत. जेठालालचं लग्न झालेलं असतानाही त्याला बबिता विशेष आवडते. त्यामुळे तिला इम्प्रेस करण्यासाठी जेठालाल ना- ना प्रकार करत असतो. त्यामुळेच मालिकेमध्ये अनेक विनोदी किस्से घडतात. विशेष म्हणजे त्यामुळेच ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीत उतरते. त्यातच या दोघांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जेठालाल आणि बबिता एका रोमॅण्टिक गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.
‘तारक मेहता…’च्या सेटवर लवकरच काहीतरी धमाकेदार कार्यक्रम होणार असल्याची शक्यता असून त्यासाठी जेठालाल (दिलीप जोशी) आणि बबिता (मुनमुन सिंह) डान्सची प्रॅक्टीस करताना दिसत आहेत. मुनमुनने इन्स्टाग्रामवर या डान्स प्रॅक्टीसचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे त्याला तुफान लोकप्रियता मिळताना दिसत आहे.