टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये काम करणारी अभिनेत्री खुशबू तावडेचा काही दिवसांपूर्वीच साखरपुडा झाला. मालिकेत ‘बुलबुल’ची भूमिका साकारणाऱ्या खुशबूने ‘देवयानी’ फेम संग्राम साळवी याच्याशी साखरपुडा केलाय.
‘देवयानी’ या मालिकमुळे संग्राम साळवी हे नाव प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचले. या मालिकेतील ‘तुमच्यासाठी काय पण’ हा त्याचा संवाद चांगलाच गाजला होता. तर खुशबू केवळ मराठी इंडस्ट्रीतच नाही, तर हिंदी इंडस्ट्रीतदेखील तितकीच प्रसिद्ध आहे. ‘तेरे बीन’ या मालिकेतील तिच्या अभिनयाला विशेष पसंती मिळाली होती. चंद्रशेखर गोखले यांनी लिहिलेल्या ‘सांजबहर’मध्ये संग्राम आणि खुशबूने एकत्र काम केले होते. बहुदा तिथेच या दोघांची मनं जुळली असावीत. या दोघांचा साखरपुडा खासगी समारंभात पार पडला. त्यांचे नातेवाईक आणि जवळच्या मित्रमंडळींनी साखरपुड्याला येऊन या भावी दाम्पत्याला शुभेच्छा दिल्या. साखरपुड्यातील त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
खुशबूने ‘तू भेटशी नव्याने’, ‘पारिजात’ यांसारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले असून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’, ‘प्यार की ये एक कहानी’, ‘तेरे लिए’, ‘तेरे बिन’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली. तर संग्रामने मालिकांसोबतच काही मराठी चित्रपटांमध्येही काम केले आहे. तसेच, ‘सरस्वती’ मालिकेमध्ये त्याने वठवलेली सर्जेराव चौधरीची भूमिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस पडली.
