बी-टाऊनमधील सेलिब्रिटींचे अनेक चाहते देशात आढळून येतात. आपला आवडता सेलिब्रिटी काय खातो, कुठे जातो, कुठे राहातो, इत्यादीची माहिती ते आवर्जुन ठेवतात. सध्याच्या इंटरनेटच्या युगात तर त्यांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटीची क्षणाक्षणाची माहिती मिळते. काही चाहते एवढ्यावरच न थांबता त्यांच्याप्रमाणे वेशभूषा अथवा केशरचना करून त्यांच्यासारखे दिसाण्याचा प्रयत्न करतात. क्वचित प्रसंगी बॉलिवूड कलाकाराप्रमाणे हुबेहुब दिसणारेदेखील समाजात पाहायला मिळतात.
चाहत्यांमधील हे आकर्षण केवळ सेलिब्रिटींपुरतेच मर्यादीत नसून, त्यांच्या मुलाबाळांबाबतदेखील त्यांच्यात असेच आकर्षण दिसून येते. अनेक सेलिब्रिटींची मुले इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटरवर चांगलीच प्रसिध्द आहेत. सोशल मीडियावर त्यांचे असंख्य फॉलोअर्स आहेत. सैफ आणि करिनाचा मुलगा तैमूर यासर्वांत आघाडीवर आहे. तैमूर विषयीच्या बातम्यांबरोबरच त्याच्याबाबतची भली-बुरी चर्चा इंटरनेटवर चांगलीच रंगते.
तैमूरला टक्कर देण्यासाठी आता आणखी एका सेलिब्रिटीचा मुलगा पुढे येताना दिसत आहे. हा ‘सेलिब्रिटी किड’ हुबेहुब तैमूरसारखाच दिसतो. सनी लिओनीचा मुलगा आणि तैमूरमध्ये दिसण्यात कमालीचे साम्य आहे.
अलिकडेच सनीचा मुलासोबत प्ले-स्कुलमधून बाहेर पडतांनाचा फोटो काढण्यात आला होता. या फोटोत तो हुबेहुब तैमूरसारखा दिसत असल्याचे पाहायला मिळते. येणाऱ्या काळात तैमूरप्रमाणेच सनीचा मुलगादेखील इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरल्यास नवल वाटायला नको.