सोशल मीडियावर सध्या फ्लॅशबॅक फोटोजचा ट्रेंड सुरु आहे. सर्वसामान्यांपासून अगदी सेलिब्रिटींपर्यंत अनेक जण आपले जुने फोटो पुन्हा एकदा पोस्ट करुन त्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. असाच एक फ्लॅकबॅक फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोमध्ये एक व्यक्ती हत्तीच्या पिल्लाला आपल्या खांद्यावर घेवून चालताना दिसत आहे.

कोण आहे हा व्यक्ती?

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार या व्यक्तीचं नाव पलानीचामी शरदकुमार असं आहे. ते तमिलनाडुमधील मेट्टुपालयम येथे वन अधिकारी म्हणून काम करतात. १२ डिसेंबर २०१७ साली त्यांच्या ऑफिसमध्ये एक फोन आला. एका हत्तीचं पिल्लू खड्यात पडलं आहे अशी माहिती या फोनवरुन त्यांना मिळाली. त्यांनंतर त्यांची पुर्ण टीम या पिल्लाला बाहेर काढण्यासाठी घटनास्थळी पोहोचली. त्यांनी बुल्डोजरच्या मदतीने त्या हत्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ते पुल्लू थकलं होतं. त्यामुळे वन अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत नव्हतं. अखेर शरदकुमार स्वत: त्या चिखलाच्या खड्ड्यात उतरले आणि त्यांनी त्या पिल्लाला खांद्यावर उचलून बाहेर काढले. हा फोटो त्यावेळीच काढला गेला होता.

भारतीय वन सेवा अधिकारी दीपिका बाजपेयी यांनी पुन्हा एकदा हा फोटो ट्विट केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी या आश्चर्यचकित करणाऱ्या फोटोवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.