मार्व्हलप्रेमींसाठी त्यांच्या सुपरहिरोंचं जग गेल्या काही वर्षात वेगवेगळ्या प्रयोगपटांभोवती फिरत होतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. मार्व्हलपटांच्या शृंखलेतील कॅप्टन अमेरिका, आयर्नमॅन, थॉर, हल्क, ब्लॅक विडो, हॉक आय या प्रमुख मंडळींसह सुपरहिरोंच्या टीमची एकत्रित गोष्ट ‘मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्स’च्या तिसऱ्या टप्प्यातच संपली होती. २०१९ मध्ये तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर २०२१ ते २०२५ या पाच वर्षांच्या काळात चौथ्या आणि पाचव्या टप्प्यात नवे सुपरहिरो आणि जुन्यांपैकी काहींच्या स्वतंत्र कथा मांडून झाल्या. आता खऱ्या अर्थाने या नव्या व्यक्तिरेखांना जुन्या काही लोकप्रिय व्यक्तिरेखा आणि कॉमिकच्या अनुषंगाने महत्वाची पात्रे जोडून घेत एमसीयूच्या सहाव्या पर्वाची नांदी सुरू झाली आहे. आणि त्याचा पहिला अध्याय ठरला आहे तो ‘द फॅन्टॅस्टिक फोर : फर्स्ट स्टेप्स’.
‘द फॅन्टॅस्टिक फोर : फर्स्ट स्टेप्स’ हा मार्व्हलच्या ‘फॅन्टॅस्टिक फोर’चा नवा अवतार असला तरी दोन्हींची कथा पूर्णपणे भिन्न आहे. आधी उल्लेख केला त्याप्रमाणे मॅट शॅकमन दिग्दर्शित ‘द फॅन्टॅस्टिक फोर : फर्स्ट स्टेप्स’ हा एमसीयूच्या सहाव्या पर्वाची सुरूवात करणारा चित्रपट आहे, ज्याचा थेट संबंध डॉ. डूम या महत्वाच्या पात्राशी जोडला गेला आहे. आणि हा नेमका धागा पकडत या चित्रपटाची मांडणी दिग्दर्शक मॅट शॅकमन यांनी केली असल्याने या चित्रपटाने मार्व्हलप्रेमींच्या मनात पुन्हा एकदा चैतन्य जागं केलं आहे. या चित्रपटाची कथा आणि त्यातल्या महत्वाच्या चार व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार या दोन जमेच्या बाजू असल्याने नव्या फॅन्टॅस्टिक फोरची फर्स्ट स्टेप रंजक ठरली आहे. ‘फॅन्टॅस्टिक फोर’च्या आधीच्या पर्वातील दुसऱ्या चित्रपटातील व्यक्तिरेखा सिल्व्हर सर्फर आणि गॅलॅक्टस या दोन महत्वाच्या पात्रांचा समावेश नव्या चित्रपटातही आहे. एकीकडे एक संपूर्ण नवी पिढी मार्व्हलचा हा ‘फॅन्टॅस्टिक फोर’ चित्रपट पाहणार आहे, त्यामुळे चित्रपटाच्या सुरूवातीलाच अंतराळवीर ते ब्रम्हांडाकडून अलौकिक शक्ती मिळालेले सुपरहिरो अर्थात फॅन्टॅस्टिक फोर हा त्यांचा प्रवास कसा झाला याची ओळख दिग्दर्शक थोडक्यात करून देतो. चित्रपटाची कथा १९६० च्या काळात घडते आहे. त्यामुळे एकीकडे जुन्या पध्दतीचे गोल दूरचित्रवाहिनी संच, त्यावर सुरू असलेले जुन्या धाटणीचे मुलाखती किंवा बातम्यांसदृश कार्यक्रम हे वास्तव आणि दुसरीकडे पृथ्वीपल्याड जात अंतराळातील विश्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा रीड रिचर्डससारखा (मिस्टर फॅन्टॅस्टिक) शास्त्रज्ञ, त्यांच्या अंतराळ मोहिमा असा भविष्याचा वेध घेण्याच्या प्रयत्नात असलेल्या मंडळींचा उत्साह अशा दोन परस्पर समांतर पातळ्यांवर या चित्रपटाची कथा घडते.
रीड रिचर्ड (मिस्टर फॅन्टॅस्टिक), सू स्टॉर्म (इनव्हिजिबल वुमन), जॉनी स्टॉर्म (ह्युमन टॉर्च) आणि बेन ग्रिम (द थिंग) या चौघांबरोबरच आणखी एका नवीन सदस्याचा प्रवेश हा या चित्रपटातील महत्वाचा धागा आहे. त्यामुळेच जुन्या ‘फॅन्टॅस्टिक फोर’च्या कथेला एक नवं वळण देण्यात दिग्दर्शक मॅट शॅकमन यांना यश मिळालं आहे. या नव्या सदस्याची नवी शक्ती, त्या शक्तीची कल्पना नसल्याने चाचपडणारं रीड आणि सू हे जोडपं आणि या छोट्या सुपरहिरोच्या आगमनाची वाट पाहात असलेला गॅलॅक्टससारखा ब्रम्हांडातले ग्रह खात सुटलेला खलनायक अशी बांधेसूद पटकथा असलेला हा चित्रपट मार्व्हलप्रेमींची कुठेही निराशा करत नाहीत. सशक्त कथानकाला या फॅन्टॅस्टिक फोरच्या व्यक्तिरेखा साकारणारे कलाकार अनुक्रमे पेड्रो पास्कल, व्हेनेसा कर्बी, जोसेफ क्वीन आणि एबन मॉस बॅकरॅक यांनी खरी गंमत आणली आहे. हे चौघंही आपापल्या भूमिकांमध्ये चपखल बसले आहेत, अर्थात चौघांमध्ये सगळ्यात अधिक वाव सू स्टॉॅर्मची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री व्हेनेसा कर्बी हिला मिळाला आहे आणि तिनेही तिच्या भूमिकेचं सोनं केलं आहे. पण या नव्या चेहऱ्यांमुळे ‘द फॅन्टॅस्टिक फोर’ अगदी दमदारपणे प्रेक्षकांसमोर आले आहेत. आता या चौघांच्या जोरावर ‘अॅव्हेंजर्स : डूम्सडे’ या महत्वाच्या चित्रपटापर्यंत होणारा प्रवास कसा असेल याची उत्सूकता मार्व्हलप्रेमींच्या मनात अधिक आहे. आणि त्यामुळेच एमसीयूच्या सहाव्या पर्वाची नांदी असलेला ‘द फॅन्टॅस्टिक फोर : फर्स्ट स्टेप्स’ हा चित्रपट चुकवू नये असा आहे.
दिग्दर्शक – मॅट शॅकमन
कलाकार – पेड्रो पास्कल, व्हेनेसा कर्बी, जोसेफ क्वीन, एबन मॉस बॅकरॅक, ज्युलिया गार्नर.