आयुष्य हा सर्वात मोठा शिक्षक आहे. काहीजण प्रवासातून जगण्याचा हेतू शोधत असतात तर काहींना वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी राहून तो उमगतो. जे काही अनुभव आपल्याला मिळत जातात, त्यातूनच माणूस समृद्ध होत जातो. मध्य प्रदेशातील एका १०० वर्षीय आजीने प्रसिद्ध दिग्दर्शक शेखर कपूर यांना हाच धडा शिकवला आहे. मध्य प्रदेशमध्ये फिरण्यासाठी गेलेल्या शेखर यांना एका चहाच्या टपरीवर ही १०० वर्षीय आजी भेटली.

चहाच्या टपरीवरील या आजींना पाहून शेखर कपूर इतके प्रभावित झाले की ट्विटरवर आजींच्या फोटोसह एक संदेश त्यांनी लिहिला. या ट्विटला हजारो लाईक्स मिळत असून सोशल मीडियावर ही पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.

‘त्या १०० वर्षांच्या आहेत. ५० वर्षांपासून इथेच चहा विकत आहेत. जवाहरलाल नेहरुंनाही चहा दिल्याचे त्यांनी सांगितले. अजूनही हास्यविनोद करत त्या मजेत आयुष्य जगत आहेत. त्यांच्यासोबत बसून पाहा, तुम्हाला त्यांच्या सहवासाची अनोखी जादू अनुभवायला मिळेल. मी स्वत:च्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी जगभर फिरतोय पण त्यांना ते इथेच, याच ठिकाणी गवसलंय,’ असे ट्विट शेखर कपूर यांनी केला आहे.

VIDEO : सलमान खानचे सिक्स पॅक अॅब्स नकली?

सर्वकाही असूनही अनेकजण आयुष्याबद्दल तक्रारी करत असतात. मात्र, १०० वर्षांच्या या आजी कोणत्याही तक्रारींविना हास्यविनोद करत मजेत जगत आहेत, हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे असल्याचे शेखर कपूर यांनी म्हटले आहे. ‘मासूम’, ‘मिस्टर इंडिया’, ‘बँडिट क्वीन’ यांसारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शन शेखर यांनी केले आहे.