बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने त्याच्या अभिनय कौशल्यामुळे बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या भूमिकांपेक्षा जास्त त्याच्या अतरंगी अवतारातील कपड्यांमुळे तो नेहमी चर्चेत असतो. रेड कार्पेट असो वा फॅशन शो असो रणवीर नेहमीच चित्रविचित्र ढंगामध्ये हजर होतो. पण असे पहिल्यांदाच झाले आहे की त्याच्या ड्रेसिंग स्टाईलमुळे दुसरीच अभिनेत्री ट्रोल झाली आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून राणी मुखर्जी आहे.
सध्या अभिनेत्री राणी मुखर्जी तिचा आगामी चित्रपट ‘मर्दानी’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तिने बॉलिवूडमधील प्रसिद्ध ड्रेस डिझायनर सब्यसाचीकडून ड्रेस डिझाइन करुन घेतला होता. सब्यसाचीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राणी मुखर्जीचा या ड्रेसमध्ये फोटो पोस्ट केला आहे. राणीचा हा ड्रेस आणि रणवीर सिंगचा लग्नाचा वाढदिवसा साजरा करताना परिधान केलेल्या ड्रेसचे कापड सेम आहे. त्यामुळे तिला सोशल मीडियावर चांगलेच ट्रोल करण्यात आले आहे.
राणी मुखर्जीचा हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नेटकऱ्यांनी राणीला तुला पाहून रणवीरची आठवण येते, रणवीरच्या ड्रेसच्या उरलेल्या कापडामध्ये तुझा ड्रेस डिझाइन केला आहे असे म्हणत ट्रोल केले आहे.
मर्दानीच्या सीक्वलमध्ये राणी एका २१ वर्षांच्या खलनायकासोबत लढताना दिसणार आहे. तिच्या वयाने लहान पण तरीही अत्यंत भयावह अशा खलनायकाशी राणीचा सामना होणार आहे. यापूर्वीच्या मर्दानी या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली असून त्याप्रमाणेच तिने मर्दानी 2 मध्ये जीव ओतून काम केले आहे. पहिल्या मर्दानी या चित्रपटात तिने ‘चाईल्ड ट्रॅफिकिंग रॅकेट’ उधळून लावणाऱ्या धाडसी पोलीस अधिकाऱ्याची भूमिका पार पाडली होती.