देशातील चित्रपटक्षेत्रात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये चमकण्याचा मराठी चित्रपटांचा गेल्या काही वर्षांचा शिरस्ता यंदाही कायम राहीला. बुधवारी जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रसृष्टीचा वरचष्मा दिसला. पदार्पणातील दिग्दर्शकाच्या सर्वोत्तम चित्रपटाकरिता दिल्या जाणाऱ्या इंदिरा गांधी पुरस्कारासाठी ‘फँड्री’चे दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि निर्मात्यांना प्रत्येकी सव्वा लाख रुपये आणि स्वर्णकमळ जाहीर झाले. याच चित्रपटातील भूमिकेसाठी सोमनाथ अवधडे याला सर्वोत्तम बालकलाकाराचा पुरस्कार विभागून मिळाला. मराठीतील सर्वोत्तम चित्रपट म्हणून चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘एक दिवस माझा’ची निवड झाली. ‘शिप ऑफ थिसिअस’ या इंग्रजी-हिंदी चित्रपटाला सर्वोत्तम चित्रपटाचे स्वर्णकमळ जाहीर झाले, तर ‘भाग मिल्खा भाग’ हा सर्वोत्तम लोकप्रिय चित्रपट ठरला आहे.
मराठी चित्रपटांसोबतच मराठी कलावंतांचा दमदार ठसा या पुरस्कारांवर जाणवत आहे. दिग्दर्शक सतीश मनवर यांच्या ‘तुह्य़ा धर्म कोन्चा’ चित्रपटाला सामाजिक प्रश्नांवरचा सर्वोत्तम चित्रपटाचे रजत कमळ जाहीर झाले आहे. दिग्दर्शक मनवर आणि निर्मात्यांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचा रोख पुरस्कारही दिला जाणार आहे. अमृता सुभाष यांना ‘अस्तु’ चित्रपटासाठी सर्वोत्तम सहायक अभिनेत्रीचा पुरस्कार विभागून मिळाला आहे. ‘तुह्य़ा धर्म कोन्चा’साठी बेला शेंडे यांना सर्वोत्तम गायिकेचा पुरस्कार जाहीर झाला आहे. सुमित्रा भावे यांना ‘अस्तु’ चित्रपटासाठी सर्वोत्तम संवादलेखकाचा पुरस्कार जाहीर झाला . ‘यलो’ चित्रपटाला ‘मिस लवली’सोबत विशेष परीक्षक पुरस्काराने गौरविले जाणार आहे. ‘यलो’तील भूमिकेसाठीच गौरी गाडगीळ आणि संजना राय यांना विशेष लक्षवेधी भूमिकेचा पुरस्कार विभागून मिळणार आहे. विशेष म्हणजे अमराठी चित्रपटातील मराठी कलावंतांनीही पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे. यात परिचित परळकर (सर्वोत्तम प्रॉडक्शन डिझायनर/ मिस लवली- हिंदी), विक्रम गायकवाड (सर्वोत्तम रंगभूषाकार / जतिश्वर- बंगाली), अंजली पाटील (विशेष लक्षवेधी भूमिका / ना बंगारु तल्ली- तेलुगू), दिग्दर्शक दीपक गावडे (सर्वोत्तम कौटुंबिक चित्रपट / हेयरो पार्टी- बंगाली) यांचा समावेश आहे. सर्वोत्तम कोकणी चित्रपटासाठी दिग्दर्शक लक्ष्मीकांत शेटगावकर यांच्या ‘बागा बीच’ची निवड झाली आहे.    

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता दिल्लीला जाणार विमानातून..!
चित्रपट तयार झाल्यानंतर नागनाथदादा मला म्हणाला होता, मला पुरस्कार मिळेल की नाही सांगू शकत नाही. पण तुला पुरस्कार नक्की आहे. दादाचे ते वाक्य आज खरे ठरले आहे. खूप खूप आनंद झाला आहे. काय बोलू आणि काय नको असे माझे झाले आहे. हा पुरस्कार मला मिळेल, असे वाटले नव्हते. याचे सगळे श्रेय दादालाच आहे. त्याने मला जो आत्मविश्वास दिला त्यामुळेच मी चित्रपटात काम करू शकलो. आजपर्यंत असा पुरस्कार वितरण सोहळा फक्त दूरचित्रवाहिन्यांवर पाहात होतो. आता मी दिल्लीला विमानातून जाऊन पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रत्यक्ष हजेरी लावणार आहे.
– सोमनाथ अवघडे (अभिनेता फॅण्ड्री)

सोमनाथच्या पुरस्काराचा  जास्त आनंद !
खूप भारी वाटते आहे. माझ्यापेक्षा सोमनाथ अवघडे याला सवरेत्कृष्ट बालकलाकार म्हणून पुरस्कार मिळाला, त्याचा आनंद सर्वात जास्त आहे.    
– नागराज मंजुळे  (दिग्दर्शक फॅण्ड्री)

खूप आनंद झाला

असे काही होऊ शकते असे वाटले नव्हते. पुरस्कार मिळेल, अशी अपेक्षाही नव्हती. पण गौरीला पुरस्कार जाहीर झाला. आज खूप आनंद झालाय.     स्नेहा गाडगीळ (‘यलो’ चित्रपटातील गौरी गाडगीळची आई)

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three marathi film got national award in different category