सध्या बॉलिवूडमध्ये स्टार्सपेक्षा त्यांच्या मुलांबाबतची चर्चा अधिक होताना दिसते. सेलिब्रेटी किड्स कोठेही दिसले की प्रसारमाध्यमे आणि चाहत्यांमध्ये त्यांच्या चर्चा रंगतात. अनेक वेळा स्टारप्रमाणेच या स्टारकिडलादेखील चाहते ट्रोल करत असतात. काही दिवसापूर्वी अभिनेता अजय देवगण आणि काजोलच्या मुलीला न्यासाला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. मात्र न्यासाला ट्रोल करणाऱ्यांना अजयने चांगलंच सडेतोड उत्तर दिलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अजयच्या न्यासा आणि युग या दोन्ही मुलांविषयी चर्चा रंगत आहे. त्यामुळे हे दोघही सध्या मीडियासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत. अशातच न्यासाला काही दिवसांपूर्वी विमातळावर स्पॉट करण्यात आलं. यावेळी न्यासाने घातलेल्या कपड्यांवरुन तिला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं.
“मी कलाकार आहे. माझा अभिनय तुम्हा आवडला तर त्याची प्रशंसा करा, जर नसेल आवडला तर माझ्यावर टिकादेखील करा. तुम्हाला आमच्याविषयी मत बनविण्याचा अधिकार आहे. मात्र आमच्या मुलांना तुम्ही जज करु शकत नाही. आमच्यावरुन तुम्ही त्यांच्याविषयी कोणतंही मत तयार करु नका”, असं अजयने ट्रोलर्सला सांगितलं.
पुढे तो असंही म्हणाला, “कोणत्याही व्यक्तीबद्दल पूर्ण माहिती नसताना तिच्याविषयी परस्पर मत तयार करणं अत्यंत चुकीचं आहे. जर उद्या मी कोणाविषयी माझं मत तयार केलं आणि त्याच्याबद्दल चर्चा केली तर सहाजिकचं आहे, समोरच्या व्यक्तीला वाईट वाटणार. त्याप्रमाणेच आमच्या मुलांविषयी जर चर्चा रंगत असतील तर त्यांनादेखील इतरांप्रमाणे वाईट वाटतं. त्यामुळे आमच्या मुलांना जज करणं बंद करा”.
दरम्यान, ‘टोटल धमाल’च्या प्रमोशन करत असताना अजयने त्यांच हे मत मांडलं असून न्यासाला आता या साऱ्याची सवय झाली आहे. पण जेव्हा माझ्या मुलांना कोणी ट्रोल करतं तेव्हा मला प्रचंड वाईट वाटतं, असंही त्याने सांगितलं. अजयचा ‘टोटल धमाल’ २२ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये अजयसह तगडी स्टारकास्टदेखील झळकणार आहे.