बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्या जुहूच्या राहत्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. बुलेट बनवारीलाल यादव (२५) असे या व्यक्तीचे नाव असून तो पुण्याचा राहणारा आहे. तो मुळचा बिहारचा असून सध्या तो पुण्यात राहत असल्याचे कळते.
बुलेट यादवने सुरक्षा रक्षकांना चकवा देत, बच्चन यांच्या जुहूतील घरात घुसण्याचा प्रयत्न केला. बुलेट यादवने भिंतीवरुन उडी मारुन प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी सुरक्षा रक्षकांनी पकडल्यामुळे, हा प्रकार उघडकीस आला. अमिताभ बच्चन यावेळी घरीच होते.
तो स्वतः एक गायक असल्याची माहिती बनवारीलालने दिली. अमिताभ बच्चन यांना गाणे ऐकवण्यासाठी हे सगळे केल्याचे यादवने सांगितले. या सर्व प्रकारानंतर बुलेट यादव विरोधात जुहू पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेलिब्रिटींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी घुसखोरी करण्याची ही काही पहिलीच घटना नाहीए. याआधीही ‘फॅन’ सिनेमाच्या दरम्यान शाहरुख खानच्या घरी त्याचा फॅन त्याच्या स्विमिंग पूलमध्ये जाऊन आंघोळ करुन आला. सुरक्षा रक्षकाने त्याला फटकारले असता, त्याला फक्त शाहरुख खानच्या स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करण्याची इच्छा होती असे तो म्हणाला.