संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत, मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ – संत तुकाराम. तुकोबांच्या अभंगवाणीने प्रत्येक मराठी मनात अभंग स्थान मिळवलं आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठी वाहिनीवरील ‘तू माझा सांगाती’ मालिकेत रेखाटण्यात येत आहे. आठशेहून अधिक भागांचा टप्पा यशस्वीपणे पार केलेली ही मालिका आता भक्तीच्या परमोच्च बिंदूवर येऊन ठेपली आहे. संत महात्म्यांवर आधारित आठशेहून अधिक भाग पूर्ण करणारी ही पहिली मालिका. संत तुकारामाची भूमिका वठवणाऱ्या चिन्मय मांडलेकरला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली. आता या मालिकेद्वारे ऋजुता देशमुखची खूप वर्षांनंतर टेलिव्हजनवर एण्ट्री होणार आहे. ऋजुता या मालिकेमध्ये आवलीची भूमिका साकारणार आहे. ऋजुताच्या चेहऱ्यातील गोडवा आणि तिचे गोड बोलणे यातून तिने प्रेक्षकांच्या मनात खूप आधीच एक अबाधित स्थान निर्माण केले आहे. आता आवलीच्या भूमिकेत देखील ती प्रेक्षकांना आपलस करेल यात शंका नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तू माझा सांगाती’ या मालिकेमध्ये आवलीची भूमिका करणे तसे आव्हानात्मक आहे. तुकाराम हे स्वभावाने अगदी साधे, विठोबाच्या भक्तीमध्ये स्वत:ला झोकून टाकलेले आणि अगदी त्याविरुध्द आवली… आवलीचा तुकारामांच्या प्रांपचिक आयुष्यात खूप मोठा हातभार होता. त्यामुळे तुकारामांबरोबरच आवलीचे देखील तितकेच महत्व आहे. ‘आवली ही स्वभवाने स्पष्ट व्यक्ती तसेच व्यवहारी अशी होती. अशा प्रकारची भूमिका निभावणं हे खरंच खूप आव्हानात्मक आहे. पण मी या भूमिकेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे’, असे ऋजुता देशमुख म्हणाली. ऋजुता ‘सावर रे’ या मालिकेनंतर तब्बल तीन वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुन्हा येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांना आपल्या लाडक्या ऋजुताला एका नव्या आणि वेगळ्याच भूमिकेत बघायला नक्कीच आवडेल, यात शंका नाही.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tu majha saangaati serial rujuta deshmukh comeback on television after 3 years