लग्नानंतर सरलेल्या प्रेमाची उरलेली गंमतीदार गोष्ट

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेमविवाहाच्या गाठी या प्रेमानेच बांधल्या जातात पण काही काळ लोटला की यातील केवळ विवाह एवढाच शब्द उरतो आणि प्रेमाचा गोडवा हळू हळू ओसरु लागतो. लग्नाआधी एकमेकांशी कायम प्रेमाने वागण्याच्या, सोबत देण्याच्या, कधीही न भांडण्याच्या आणाभाका हवेत विरुन जातात आणि कोणत्या गोष्टीवरुन भांड्याला भांडं लागतं याचा पत्ताही लागत नाही. थोडक्यात काय प्रेमविवाह झालेल्यांच्या घरोघरी या समस्यांच्या चुली पेटलेल्या दिसतातच आणि त्यातून वादाचा धूरही निघताना आपण कायम बघतो. प्रेमावर वाद कुरघोडी करतात आणि त्याच नात्याच्या आड येतात. अर्थात हे वाद अतिशय छोट्या छोट्या गोष्टींवरुन असतात पण राईचा पर्वत कधी होतो ते दोघांनाही कळत नाही. अशाच काही हलक्या फुलक्या वादांची आणि प्रेमाच्या नात्याची गोष्ट प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी तुझं माझं ब्रेक अप या मालिकेमधून. येत्या १८ सप्टेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वा. ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
तुझं माझं ब्रेक अप मालिकेची कथा आहे समीर आणि मीराची. एकाच महाविद्यालयात शिकणारे हे दोघे जण. वर्गातील बाकावरुन बागेतील बाकावर यांचं प्रेम कधी पोहचलं हे त्यांनाही कळलं नाही. समीर हा धनाड्य देसाई कुटुंबाचा एकुलता एक लाडका सुपुत्र. विशेषतः आईचा लाडका. हवं ते हवं तेव्हा हातात मिळतंय त्यामुळे वेगळ्या कष्टाची आणि शिस्तीची त्याला कधीच सवय लागली नाही. तर दुसरीकडे मीरा एका मध्यमवर्गीय कुटुंबातील शिस्तबद्ध मुलगी. स्वतःचं काम स्वतः करणारी आणि कुणी काम करताना पसारा केला की त्याला धारेवर धरणारी. असे हे भिन्न स्वभावाचे दोन जीव एकमेकांच्या प्रेमात पडतात.

वाचा : Video … अन् कतरिनाच्या डोळ्यात आले अश्रू

असं म्हणतात की प्रेम हे आंधळं असतं आणि लग्नानंतर डोळे उघडतात तसंच काहीसं यांच्या बाबतीतही होतं. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस प्रेम आणि आनंदात पार पडतात पण त्याचा गोडवा ओसरला की मग सुरु होते संसाराची तारेवरची कसरत. लग्नाआधी एकमेकांच्या अवगुणांवर पडदा टाकणारे हे दोघे लग्नानंतर कोणताही आडपडदा न ठेवता एकमेकांच्या चुका काढायला लागतात आणि भांडायलाही लागतात. लग्नाआधी एकमेकांचा दुरावा एक क्षणही सहन न करणारे आता एकमेकांनाच सहन करतायत असं चित्र निर्माण होतं. आणि बघता बघता हे भांडण एवढ्या टोकावर जातं की ते दोघे वेगळं होण्याचाही निर्णय घेतात.

लग्नानंतर वर्षभरातच वेगळं झाल्यानंतर त्यांना एकमेकांची उणीव भासायला लागते आणि प्रेमाची जाणीवही होते. मग ते दोघे पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतात. पण हा निर्णय त्यांच्या घरच्यांना मान्य होईल का ? पुन्हा एकत्र येताना आधी केलेल्या चुकांना टाळण्यासाठी दोघांना काय कसरत करावी लागेल ? आणि प्रेमाचा गोडवा हरवलेला हा संसार पुन्हा गोडी गुलाबीचा संसार बनेल का ? याचीच गोष्ट म्हणजे ही मालिका. घाईने प्रेमात पडणा-या आणि घाईने लग्नाच्या गाठी जोडणा-या जोडप्यांच्या सुखी संसाराची स्वप्नं अपेक्षांच्या कसोटीवर खरी उतरतात का? याची ही मजेदार गोष्ट प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाली आहे.

वाचा : PHOTO मुलाच्या वाढदिवसाला अक्षयने शेअर केला खास फोटो

‘तुझं माझं ब्रेक अप’ या मालिकेत समीरची भूमिका सायंकित कामत हा अभिनेता साकारत आहे तर मीराच्या भूमिकेत केतकी चितळे ही अभिनेत्री आहे. याशिवाय मालिकेत रोहिणी हट्टंगडी, उदय टिकेकर, विजय निकम, राधिका हर्षे, संयोगिता भावे, रेश्मा रामचंद्र, उमेश जगताप, मधुगंधा कुलकर्णी आदी अनुभवी कलाकारांची फौजही बघायला मिळणार आहे. सोमील क्रिएशन्सची निर्मिती असलेल्या या मालिकेचं दिग्दर्शन हेमंत देवधर यांचं आहे. मालिकेची कथा शेखर ढवळीकर यांची असून पटकथा चिन्मय मांडलेकर यांची आहे तर संवाद मुग्धा गोडबोलेंचे आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tujh majh break up new serial on zee marathi