मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी आदिनाथ आणि उर्मिला कोठारे यांना १८ जानेवारीला कन्यारत्न झाले. आदिनाथने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून मुलगी झाल्याची गोड बातमी दिली होती. मुलीच्या जन्मानंतर उर्मिलाने सोशल मीडियावर तिच्या मुलीचे म्हणजे जिजाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. त्यातच दिवाळीच्या निमित्ताने उर्मिलाने जिजाचा नवा फोटोही शेअर केला आहे.
यंदा जिजाची पहिलीच दिवाळी असल्यामुळे तिच्यासाठी सारं काही खास असावं याकडे कोठारी कुटुंबियांचा कल आहे. त्यामुळे दिवाळीतील प्रत्येक दिवसाचं महत्व जाणत कोठारी कुटुंबीय जिजासोबत हे दिवस सेलिब्रेट करत आहेत. नुकतंच जिजाचं पहिलं अभ्यंग स्नान झालं आणि या क्षणाचा फोटो उर्मिलाने चाहत्यांसोबत शेअर केला.
उर्मिलाने शेअर केलेल्या फोटोमध्ये छोटी जिजा आपल्या बाबांच्या म्हणजेच आदिनाथच्या मांडीवर बसली असून तिच्या उटणं लावण्यात आलं आहे. ‘आमच्या जिजाची पहिली दिवाळी, अभ्यंग स्नान’ असं कॅप्शनही उर्मिलाने या फोटोला दिलं आहे. विशेष म्हणजे या फोटोत जिजा प्रचंड गोड दिसत असल्याचं चाहत्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जिजाची ही पहिलीच दिवाळी असल्यामुळे संपूर्ण कोठारी कुटुंबीय हे दिवस खास करण्याचा प्रयत्न करत असल्याचं एकदंरीत पाहायला मिळत आहे.