काही वर्षांपूर्वी जेव्हा ‘कहानी’ आणि ‘द डर्टी पिक्चर’सारखे सिनेमे विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचे धाडस कोणी केले नव्हते. विद्याने ते आव्हान लिलया पेलले, तिच्या सिनेमांनी तिकीटबारीवर पण चांगली कमाई केली. कोणतीही हटके भूमिका साकारण्याचे आव्हान विद्या अगदी लिलया पेलते. तिच्या आगामी सिनेमासाठीही तिने असेच मोठे आव्हान स्वीकारले आहे.
बॉलिवूडमध्ये हरहुन्नरी अभिनेत्री अशी ओळख असलेल्या विद्या बालनचा ‘बेगम जान’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सध्या विद्या या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या प्रमोशनमध्ये विद्याचे नवनवीन लूक समोर येत आहेत. विद्याच्या या अदा ‘बेगम जान’लाच शोभणाऱ्या असल्याने प्रेक्षकांच्या नजरा काही केल्या तिच्यावरुन हटत नाहीत.
विद्याच्या मते, या सिनेमात काम करण्याचा अनुभव अविस्मरणीय असाच होता. त्यामुळे सध्या मी या सिनेमाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहे. प्रेक्षक सिनेमाचा मनमुराद आनंद घेतील, असा मला विश्वास आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. ‘श्रीजीत मुखर्जी’ दिग्दर्शित ‘बेगम जान’ हा बंगाली सिनेमा ‘राज कहिनी’ याचा रिमेक आहे. ‘बेगम जान’मध्ये विद्या भारताच्या फाळणीदरम्यान पंजाब येथील कुंटणखान्याच्या मालकिणीची भूमिका साकारत आहे. तिच्यासोबत अभिनेता नसिरुद्दीन शाह आणि गोहर खान मुख्य भूमिकेत आहेत. हा सिनेमा येत्या १४ एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.