‘अर्जुन रेड्डी’ फेम अभिनेता विजय देवरकोंडा गॉसिप पसरवणाऱ्या वेबसाइट्सवर संतापला आहे. अनेकदा त्याच्या चित्रपटांना वाईट पद्धतीने मांडण्यात आलं, लोकांची मदत केली तरी त्याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिलं गेलं, त्याने केलेल्या मदतीवर प्रश्न उपस्थित केले असे काही तक्रारींचे विषय घेऊन विजयने सोशल मीडियावर या वेबसाइट्सविरोधात एक मोहीमच सुरू केली आहे. एक व्हिडीओ पोस्ट करत त्याने अशा गॉसिप वेबसाइट्सविरोधात आवाज उठवला आहे.

“मी केलेल्या मदतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे तुम्ही कोण? ही माझ्या मेहनतीची कमाई आहे आणि ते मी माझ्या इच्छेनुसार दान करेन. तुमची वेबसाइट ही आमच्या जाहिराती व चित्रपटांमुळे चालते. काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला मुलाखत देण्यास नकार दिला होता आणि तेव्हापासून तुम्ही माझ्याविरोधात नकारात्मक बातम्या सुरुवात केली”, असा आरोप त्याने या व्हिडीओत केला आहे.

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये विजयने लिहिलं, “ज्यांना सत्याचे रक्षक मानले जाते तेच जाणूनबुजून जर तुमच्याशी खोटं बोलत असतील आणि तुमचा विश्वास तोडत असतील तर हा समाज संकटात आहे असं समजा. तुम्ही माझं करिअर उध्वस्त करा, माझी प्रतिमा मलिन करा, माझ्याविषयी वाटेल ते लिहा, मला काही फरक पडत नाही.”

विजयच्या या व्हिडीओनंतर अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्याला साथ दिली. महेश बाबू, राणा डग्गुबत्ती, रवी तेजा, राशी खन्ना यांसारख्या कलाकारांनी विजयला पाठिंबा दिला.