अभ्यासू, चोखंदळ आणि शिस्तीचा कलावंत असे विविध कंगोरे असणाऱ्या दिग्गजांच्या यादीत विक्रम गोखले यांचे नाव मानाने घेतले जाते. रंगभूमी, मालिका आणि चित्रपटातून सहजगत्या रसिकांच्या मनाचा वेध घेण्यास यशस्वी ठरलेल्या या कसबी कलाकाराची अभिनय कारकीर्द प्रदीर्घ आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विक्रम गोखले यांच्या घराण्यातच कलावंतशाही मुरलेली दिसून येते. त्यांच्या आजी कमलाबाई गोखले या पहिल्या महिला बालकलाकार तर वडील चंद्रकांत गोखले हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील नावाजलेले अभिनेते होते. अशा प्रकारे अभिनयाची गेली १०० वर्षे जुनी परंपरा असणाऱ्या ‘गोखले’ कुटुंबियाचे विक्रम गोखले एक महत्वाचे शिलेदार आहेत. मात्र, घराणेशाहीच्या जोरावर अभिनयक्षेत्रात दमदार पाऊल टाकण्याचा मार्ग त्यांनी कधीच स्वीकारला नाही. मराठी, हिंदी आणि गुजराती अशा तीन भाषांमध्ये काम करत विक्रम गोखले यांनी आपल्यातील कलावंताला अधिक प्रगल्भ केले.

अभिनय क्षेत्राची तब्बल ५० वर्षे अविरत सेवा करतानाच त्यांनी दुसरीकडे सामाजिक बांधिलकीचा वसा देखील जपला. अपंग सैनिक आणि समाजातील उपेक्षितांसाठी वडील चंद्रकात गोखले यांच्यासोबत गेली कित्येक वर्षे ते कार्य करीत आहेत. अशा या मातब्बर नटश्रेष्टाच्या कारकीर्दीचा आढावा लवकरच माहितीपटातून घेतला जाणार आहे. थीम्स अनलिमिटेड आणि इंडियन फिल्म स्टुडिओच्या बॅनरअंतर्गत या माहितीपटाचे चित्रिकरण होत असून, योगेश सोमण, आशिष वाघ आणि उत्पल आचार्य या तीन निर्मात्यांनी संयुक्तपणे याची निर्मिती केली आहे, तसेच या माहितीपटाची संकल्पना आणि दिग्दर्शन विवेक वाघ करत आहेत.

शेखर ढवळीकर लिखित या माहितीपटातून विक्रम गोखले यांच्या अभिनयाची प्रदीर्घ कारकीर्द रसिकांसमोर सादर केली जाणार आहे, या माहितीपटाबरोबरच विक्रम गोखले यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तींकडून त्यांचा जीवनप्रवास देखील कथित केला जाईल. शिवाय, खुद्द विक्रम गोखले देखील आपल्या आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न या माहितीपटातून करताना दिसतील. अभिनयाचा वारसा लाभलेल्या विक्रम गोखले या ‘विक्रमी’ कलावंताचा हा माहितीपट लवकरच प्रदर्शित होत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram upcoming documentry on veteran actor vikram gokhale