भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात सोमवारी (११ जानेवारी २०२१) चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं. अनुष्काने सोमवारी दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला असून विराटने ट्विट करत ही आनंदाची बातमी नेटकऱ्यांना सांगितली. त्यानंतर आता विराट-अनुष्काच्या मुलीचा पहिला फोटो समोर आला आहे. कोहली कुटुंबातील सर्वच सदस्य या नवीन पाहुणीच्या आमगमाने खूपच आनंदात आहे. विराटचा भाऊ म्हणजेच बाळाच्या काकाने इन्स्टाग्रामवरुन विराट-अनुष्काच्या मुलीचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.
विराट आणि अनुष्का आई-बाबा झाल्याची माहिती समोर आल्यानंतर अनेक सेलिब्रिटी त्यांना शुभेच्छा देत आहेत. त्याचप्रमाणे चाहत्यांनाही सोशल नेटवर्किंगच्या माध्यमातून विराट अनुष्कावर शुभेच्छांचा वर्षाव केलाय. मात्र या सर्वांमध्ये विराटचा भाऊ म्हणजेच विकास कोहलीने शेअर केलेला फोटो खास चर्चेत आहेत. विकासने विराट अनुष्काच्या मुलीच्या इवल्याश्या पायांचा फोटो शेअर करत आनंद व्यक्त केलाय. आम्हाला खूप आनंद झाला असून आमच्या घरी एक परी आलीय, अशी कॅप्शन विकासने या फोटोला दिली आहे. फोटोवर वेलकम म्हणजेच तुझे स्वागत आहे असा मजकूरही लिहिलेला आहे.
सोमवारी दुपारी चारच्या सुमारास विराटने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना ही गोड बातमी दिली. आम्हाला दोघांना हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आज दुपारी आमच्या मुलीचा जन्म झाला. तुमचं प्रेम आणि आशीर्वाद यांसाठी आम्ही खूप आभारी आहोत. अनुष्का आणि आमची मुलगी, दोघीसुद्धा ठीक आहेत आणि आमचं हे सौभाग्य आहे की आम्हाला आयुष्यात ही गोष्ट अनुभवता आली. यावेळी आम्हाला थोडी प्रायव्हसी हवी असेल हे तुम्ही नक्कीच समजू शकता असं आम्ही समजतो, अशा आशयाची पोस्ट विराटने शेअर केली.
— Virat Kohli (@imVkohli) January 11, 2021
ऑगस्ट महिन्यात विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट करत ती गरोदर असल्याचं सांगितलं होतं. ‘जानेवारी २०२१ पासून आम्ही दोनाचे तीन होणार’, असं कॅप्शन देत विराटने अनुष्कासोबतचा फोटो पोस्ट केला होता. विराट-अनुष्काने ११ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या तीन वर्षांनंतर या दोघांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालं आहे.