Renukaswamy Case Chargesheet: कन्नड अभिनेता दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा गौडा यांनी त्यांच्याच चाहत्याची हाल हाल करून हत्या केली होती. या हत्या प्रकरणात आता बंगळुरू पोलिसांनी ३,९९१ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. ज्यामध्ये मृत चाहता रेणुकास्वामीने अभिनेत्री पवित्रा गौडाला कोणते संदेश पाठवले याची माहिती देण्यात आली आहे. रेणुकास्वामीने पवित्राला त्याच्यासह लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची ऑफर दिली होती. यासाठी तो तिला दरमहा १० हजार रुपये द्यायला तयार होता. तसेच रेणुकस्वामी पवित्राला अश्लील संदेश आणि गुप्तांगाचे फोटोही पाठवत असल्याचा उल्लेख आरोपपत्रात केला आहे.
रेणुकास्वामी काय संदेश पाठवायचा?
मृत चाहता रेणुकास्वामी सोशल मीडियावर संदेश पाठवत असल्याचे सांगितले गेले आहे. “तू छान दिसतेस. तुझा मोबाइल नंबर दे, प्लिज. तुला माझ्याकडून काय पाहिजे? तुला जे पाहिजे, ते पाठवू का? तू माझ्याशी गूप्त संबंध ठेवशील का? माझ्याबरोबर लिव्ह इनमध्ये राहशील का? मी तुला दरमहा १० हजार रुपये देईल”, असे काही संदेश मृत रेणुकास्वामीने पाठविल्याचे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.
आरोपपत्रानुसार पोलिसांनी पवित्रा गौडाला आरोपी क्रमांक एक ठरविले आहे. तर अभिनेता दर्शन दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे. रेणुकास्वामीचे अश्लील संदेश सहन न झाल्यामुळे पवित्रा गौडाने सहकारी पवनला रेणुकास्वामीच्या संदेशला पाहून घेण्यास सांगितले होते. रेणुकास्वामीला जाळ्यात अडकविण्यासाठी पवनने पवित्रा गौडाच्या नावे त्याच्याशी चॅट करायला सुरुवात केली. त्यानंतर रेणुकास्वामीशी चॅटिंगमधून जवळीक वाढवत तो कुठे राहतो, याचा थांगपत्ता पवनने काढला.
बंगळुरू पोलिसांनी या प्रकरणी ६५ फोटोही गोळा केले असून ते आरोपपत्रात जोडले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपपत्र दाखल झाल्यामुळे आता अभिनेता दर्शनच्या वकिलांकडून जामीनासाठी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या खटल्यातील साक्षीदार आणि प्रत्यक्षदर्शीबद्दल पोलीस काळजीत आहेत. ज्या शेडमध्ये रेणुकास्वामीला आणले गेले आणि तिथे त्याचा छळ करून खून झाला, त्या शेडचा वॉचमन या खटल्यातील प्रमुख साक्षीदार आहे. त्यानेच अभिनेता दर्शन आणि पवित्रा गौडाला तिथे येताना पाहिले होते. तसेच शेडमधील दोन मजुरांनी रेणुकास्वामीचा छळ प्रत्यक्ष पाहिला होता. तेही या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी आहेत.
अभिनेता दर्शन, अभिनेत्री पवित्रा गौडा यांच्यासह एकूण १७ जण या गुन्ह्यात आरोपी आहेत. मृत चाहता ३३ वर्षीय रेणुकास्वामी याचा खून होण्यापूर्वी घेतलेला एक फोटो सध्या समोर आला आहे. मारेकऱ्यांनी रेणुकास्वामीला विवस्त्र करून मारहाण केली होती. मरण्यापूर्वी आपल्याला सोडून द्यावे, अशी गयावया करताना रेणुकास्वामी या फोटोंमध्ये दिसत आहे. हा फोटो समोर आल्यानंतर रिक्षाचालक असलेल्या रेणुकास्वामीच्या पालकांनी एकच टाहो फोडला. हा हत्येमध्ये दर्शनचा सहकारी असलेल्या एका आरोपीच्या मोबाइलमधून हे फोटो पोलिसांना मिळाले.