* रेल्वेची ‘अशास्त्रीय’ आकडेवारी? ल्ल २०१४ मध्ये सर्वाधिक मृत्यू कोपर स्थानकाजवळ

रेल्वे अपघात रोखण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने स्थापन केलेल्या आढावा समितीच्या बैठकीत सादर झालेल्या आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत धावत्या गाडीतून पडून २१२७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीत अपघाताची विविध कारणे आणि जखमी वा मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या देण्यात आली आहे. तर रेल्वेरूळ ओलांडताना ४६४३ लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेष म्हणजे महाव्यवस्थापकांनी सादर केलेली हीच आकडेवारी ‘अशास्त्रीय’ असल्याचे कारण देऊन ही बैठक मोडली होती.
रविवारच्या बैठकीला लागलेल्या ‘लाल सिग्नल’बाबत सोमवारी रेल्वे अधिकाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाष्य केले. आढावा समितीच्या पहिल्या बैठकीत समिती सदस्यांना अपघातांची माहिती व्हावी, कोणत्या स्थानकादरम्यान किती अपघात होताहेत, त्यांचे प्रमाण गेल्या चार वर्षांत किती आहे, ही माहिती देण्यासाठी सदर आकडेवारी सादर करण्यात आली होती. अपघातांची नोंद राज्याच्या पोलीस यंत्रणेचा भाग असलेल्या लोहमार्ग पोलिसांकडे ठेवली जाते. रेल्वेकडे त्याची अधिकृत नोंद होत नाही. तरीही रेल्वेकडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार ही आकडेवारी तयार करण्यात आल्याचे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
या आकडेवारीनुसार रेल्वेरूळ ओलांडताना ४६४३ जण गेल्या चार वर्षांत दगावले आहेत. रेल्वेरूळ ओलांडणे कायद्याने गुन्हा असल्याचे वारंवार सांगून, त्याबाबत जनजागृती करूनही हे प्रकार घडत आहेत. रेल्वेने उभारलेल्या संरक्षक भिंतींना भगदाडे पाडून लोक रूळ ओलांडत असल्याच्या घटनाही आढळल्या आहेत. यावर उपाययोजना काय करणार, हा रेल्वेसमोरचा मोठा प्रश्न असल्याचे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
‘भावेश नकाते’ प्रकरणानंतर स्थापन झालेल्या या समितीसमोरील आकडेवारीनुसार गेल्या चार वर्षांत २१२७ प्रवासी चालत्या गाडीतून खाली पडून मृत्युमुखी पडले आहेत. यात सर्वाधिक ६१० प्रवाशांचा मृत्यू २०१३ या वर्षांत झाला होता. विशेष म्हणजे कोपर स्थानकाजवळ हे प्रमाण वाढल्याचेही आकडेवारीवरून समोर येत आहे. गेल्या दोन वर्षांत डोंबिवली स्थानकातील प्रवासी संख्या वाढल्यामुळे ही संख्या वाढल्याची शक्यता आहे. या आकडेवारीनुसार अपघात टाळण्यासाठी रेल्वेमार्गाभोवती संरक्षक भिंत उभारण्याबरोबरच बंद दरवाजे, उपनगरीय सेवा वाढवणे, अशा अनेक उपाययोजना शक्य आहेत, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.