३१ डिसेंबरच्या रात्री मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या ८४० मद्यपि चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यापैकी  २८० जण विनापरवाना वाहन चालवणारे होते. गेल्या १० दिवसांपासून मद्यपी वाहनचालकांविरोधात मुंबई वाहतूक पोलिसांनी मोहीम उघडली होती.
याबाबत माहिती देतांना अतिरिक्त पोलीस आयुक्त ब्रिजेश सिंग (वाहतूक) यांनी सांगितले की, डिसेंबर महिन्यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २९२३ वाहन चालकांविरोधात कारवाई करण्यात आली. त्यापैकी २७७६ मागील १० दिवसांत सापडले आहेत. ३१ डिसेंबरला पोलिसांनी ३५ ठिकाणी नाकाबंदी लावली होती. या एका दिवसात मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ८४० जणांना पोलिसांनी अटक केली. मागील वर्षी याच दिवशी ७३९ मद्यपी वाहन चालक सापडले होते. चालू वर्षांतील कारवाईत या मद्यपी चालकांपैकी ४०८८ चालकांचा वाहन परवान रद्द करण्यात आला आहे तर ५११ जणांना तुरुंगात पाठविण्यात आल्याचे सिंग यांनी सांगितले. डिसेंबर महिन्यात पोलिसांनी सिग्नल तोडण्याचे ५११ गुन्हे तर भरधाव वेगाने वाहन चालविण्याचे २ गुन्हे दाखल केले आहेत.