ठाण्यातील बिलबाँग शाळेने केलेल्या भरघोस शुल्कवाढीमुळे शाळेची मान्यता रद्द करावी तसेच आतापर्यंत शाळेने वसूल केलेल्या पैशाचे धर्मदाय आयुक्तांकडून लेखापरिक्षण करावे, असा अहवाल ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण उपसंचालकांना सादर केला आहे. ठाण्यातील बिलबाँग शाळेने अलिकडेच पालकांना विश्वासात न घेता शुल्कामध्ये भरघोस वाढ केली होती. यामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणे जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकारी पांडुरंग कवाणे यांनी अलिकडेच शाळेचे मुख्याध्यापक एस. पी. शर्मा यांची भेट घेतली. तेथे मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी शिक्षण उपसंचालकांना अहवाल सादर केला. शाळेविषयीच्या अनेक तक्रारी कवाणे यांनी त्यात नमूद केल्या आहेत.