ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना पुत्रशोक
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे पुत्र संगीतकार हेमंत भोसले यांचे सोमवारी कर्करोगाच्या दीर्घ आजाराने स्कॉटलंड येथे निधन झाले. ६५ वर्षांचे हेमंत भोसले गेली काही वर्षे स्कॉटलंड येथे वास्तव्याला होते. तिथेच त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जन्मदिनीच हेमंत भोसले यांचे निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संगीतकार म्हणून हेमंत भोसले हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. १९७० ते ८५ या कालावधीत त्यांनी संगीतकार म्हणून अनेक हिंदी चित्रपट केले. ‘अनपढ’, ‘दामाद’, ‘बॅरिस्टर’, ‘टॅक्सी टॅक्सी’, ‘फिर तेरी याद’, ‘तेरी मेरी कहानी’, ‘आया रंगीला सावन’, ‘अब कहाँ जाएंगे हम’सारख्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. मराठीतही आशा भोसले यांनी गायलेले त्यांचे ‘शारद सुंदर चंदेरी राती’ हे गाणे खूप गाजले होते. ‘जा जा जा रे नको बोलू’, ‘बाळा माझ्या नीज ना’ अशा काही निवडक मराठी गाण्यांनाही त्यांनी संगीत दिले होते. आशा भोसले यांचे ते ज्येष्ठ चिरंजीव होत. तीन वर्षांपूर्वी आशा भोसले यांची कन्या वर्षां भोसले यांनी डोक्यात गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. आता हेमंत भोसले यांच्या निधनाने आणखी एक मोठा धक्का आशाताईंना बसला आहे.
लतादीदींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम रद्द
लतादीदींचा ८६ वा वाढदिवस सोमवारी प्रभुकुंज येथे साजरा करण्यात येणार होता. मात्र, हेमंत भोसले यांच्या निधनाचे वृत्त समजताच हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.