छायाचित्रकार व शिल्पकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील भंबानी यांची हत्या व्यावसायिक वादातून आणि पैशांच्या देवघेवीतून झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला वाराणसी येथून अटक केली असून शिवकुमार उर्फ साधू राजभर असे त्याचे नाव आहे. त्याला उद्या (मंगळवार) मुंबईत आणले जाणार आहे. पाच लाख रुपयांसाठी ही हत्या झाली असल्याचे सांगण्यात येत आहे.
हेमा यांचे पती हेमंत उपाध्याय आणि अन्य दोन जणांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. हेमा आणि त्यांच्या पतीमध्ये व्यावसायिक वाद सुरू होते. जुहूमधील घरात हेमा राहात होत्या तर त्यांचे पती दिल्लीत राहतात. तसेच हेमा आणि तिच्या पतीच्या घटस्फोटाच्या खटल्याचे काम भंबानी पाहात होते.