मुली परीक्षार्थी असूनही परीक्षाविषयक कामात सहभाग: अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रकार
आपल्या दोन मुली त्याच महाविद्यालयातून अभियांत्रिकी विषयाची परीक्षा देत असताना विद्यापीठाचे नियम धाब्यावर बसवून परीक्षाविषयक कामकाजात भाग घेतल्याची गंभीर तक्रार नेरूळ येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माजी प्राचार्याविरोधात करण्यात आली आहे.
रक्ताचे नाते असताना किंवा कुटुंबातील व्यक्ती शिकत असताना परीक्षेचे कोणतेही काम करू नये, असा विद्यापीठाचा नियम आहे. या प्रकारच्या हस्तक्षेपामुळे महाराष्ट्राच्या एका मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण, तेरणा महाविद्यालयाचे माजी प्राचार्य राजरोसपणे हे प्रकार करीत असल्याचा आरोप आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडे या प्रकाराची तक्रार करण्यात आली असून परीक्षा मंडळाने हिरवा कंदील दाखविल्यास संबंधित प्राचार्याची विद्यापीठाच्या परीक्षाविषयक ‘अनफेअर मीन्स कमिटी’कडून चौकशी होऊ शकते.
सध्या वसंतदादा पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करणारे के. टी. व्ही. रेड्डी २००९ ते २०११ या दरम्यान तेरणा महाविद्यालयात प्राचार्य होते. प्राचार्य म्हणून कार्यरत असताना त्यांची ज्येष्ठ कन्या तेरणामध्येच मास्टर ऑफ इंजिनिअरिंगच्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन या शाखेत शिकत होती. ऑक्टोबर, २०१०ला तिने एमईच्या पहिल्या सत्राची परीक्षा दिली. याच काळात रेड्डी यांनी परीक्षेचे मुख्य समन्वयक (चीफ मॉडरेटर) म्हणून काम केले होते. याच काळात त्यांचे नाव इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या एमई पॅनेलवरही होते. या पॅनेलमध्ये नाव येण्यासाठी महाविद्यालयातून पात्र शिक्षकांची नावे विद्यापीठाला प्राचार्याच्या व विभाग प्रमुखांच्या स्वाक्षरीने पाठवावी लागतात. त्या नंतर विद्यापीठ स्तरावर निर्णय होऊन पात्र शिक्षकांची नावे उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांच्या यादीत समाविष्ट केली जातात. म्हणजे रेड्डी यांनी मुलीचेच पेपर तपासल्याची शक्यता नाकारता येत नाही. आपले नाव यादीत यावे यासाठी त्यांनी प्राचार्य म्हणून विभाग प्रमुखावर दबाव आणल्याची शक्यता आहे. किंवा मुलगी त्याच शाखेत शिकत असताना त्यांनी विद्यापीठाची दिशाभूल केल्याची शक्यताही नाकारता येत नाही, असा आरोप तक्रारदार आणि विद्यापीठाच्या अधिसभेचे माजी सदस्य प्रा. सुभाष आठवले यांनी केला आहे.
रेड्डी यांची दुसरी मुलगीदेखील त्यांच्या प्राचार्यपदाच्या कार्यकाळात तेरणात दुसऱ्या वर्षांला शिकत होती. ही विद्यार्थिनी नोव्हेंबर-डिसेंबर, २०१०ला झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशनच्या ‘अप्लाईड मॅथ्स’ या विषयात नापास झाली. तिला २५ गुण मिळाले होते. पण, पुनर्मूल्यांकनात ती आश्चर्यकारकरित्या ४१ गुण मिळवून पास झाली. या वेळेसही रेड्डी परीक्षेचे मुख्य समन्वयक म्हणून काम करीत होते. त्यामुळे, या सर्व प्रकाराचा तपास करण्यात यावा, अशी मागणी प्रा. आठवले यांनी केली आहे.
याबाबत विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डी. जी. वसावे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या प्रकारची तक्रार आल्याचे स्पष्ट केले. तसेच, विद्यार्थ्यांकडूनही या प्राचार्याच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन प्रा. रेड्डी यांच्या चौकशीचा मुद्दा परीक्षा मंडळाच्या बैठकीत चर्चिला जाईल. मंडळाने मान्यता दिल्यास रेड्डी यांची मंडळाच्या ‘अनफेअर मीन्स कमिटी’कडून चौकशी केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
या बाबत रेड्डी यांच्या दोन्ही मोबाईल फोनवर वारंवार प्रयत्न करूनही फोन बंद असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case against professor who breaks the rules and regulations