डोंबिवलीतील के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयातील एका कर्मचाऱ्याला उद्देशून जातिवाचक अपशब्द वापरल्याने महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रसाद लिमये यांच्या विरुद्ध मानपाडा पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
पोलिसांनी सांगितले, कालिदास जयराम परमार हे पेंढरकर महाविद्यालयातील ज्येष्ठ शिपाई आहेत. महाविद्यालयाने परमार यांना एक ‘मेमो’ दिला आहे. बुधवारी दुपारी महाविद्यालयात कर्मचारी संघटनेचे नेते डॉ. आर. बी. सिंग आले होते. त्या वेळी त्यांची भेट घेऊन परमार आपल्या प्राणीशास्त्र विभागाकडे जात असताना त्यांनी उपप्राचार्य लिमये यांना त्या मेमोबाबत विचारणा केली. त्या वेळी संतप्त होऊन लिमये यांनी परमार यांना उद्देशून जातिवाचक शब्दांचा वापर केला. या घटनेमुळे अस्वस्थ झालेल्या परमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.  
याबाबत उपप्राचार्य प्रसाद लिमये यांनी सांगितले, अशी कोणतीही घटना घडलेली नाही. आपली बदनामी आणि नाहक या प्रकरणात अडकविण्यासाठी ही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारदार कर्मचाऱ्याला महाविद्यालयाकडून एक पत्र देण्यात आले आहे. हे पत्र स्वागतकक्षातून संबंधित कर्मचाऱ्याने स्वीकारले आहे. त्या कर्मचाऱ्याची आणि आपली भेट झाली नाही. त्यामुळे जातिवाचक बोलण्याचा प्रश्नच येत नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case for missword about caste related on pendharkar college vice teacher