केंद्रातील काँग्रेसचे अनके बडे मंत्री वा नेतेमंडळी मुंबईत येत असतात. काहींच्या स्वागताचे फलक लागतात तर काहींच्या नशिबी तसे स्वागत नसते. राज्यमंत्री किंवा दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी आले वा गेले त्यांची कोणी फारशी दखलही घेत नाही. पण केवळ राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून केंद्रातील राज्यमंत्र्याचे प्रदेश काँग्रेसच्या वतीने नुकतेच मुंबईत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.
दिल्लीतील एखादा बडा नेता मुंबईत आला तर काँग्रेस संस्कृतीनुसार त्याचे जोरदार ‘स्वागत’ केले जाते. सत्तेच्या दरबारात त्या नेत्याचे स्थान किती यावर त्याचे स्वागत अवलंबून असते. लोकसभेचे नेते किंवा गृहमंत्रीपदी निवड झाल्यावर पहिल्यांदा मुंबईत आलेल्या सुशीलकुमार शिंदे यांचे भव्य स्वागत झाले नव्हते ना विमानतळ परिसरात मोठाले फलक लागले होते. पण गेल्याच आठवडय़ात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीय आणि केंद्रीय संरक्षण खात्याचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग हे मुंबईत आले असता विमानतळापासून दादपर्यंत जागोजागी त्यांच्या स्वागताचे मोठाले फलक झळकत होते. त्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची छायाचित्रे होती. एखाद्या राज्यमंत्र्यांच्या स्वागताच्या फलकावर मुख्यमंत्री किंवा राज्याच्या प्रभारींचे छायाचित्र झळकण्याचा प्रसंग दुर्मिळच म्हणावा लागेल.
काँग्रेसच्या दरबारी राजकारणात राज्यमंत्र्यांना फारशी किंमत दिली जात नाही. पण राहुल गांधी यांचे विश्वासू सहकारी असल्यानेच जितेंद्र सिंग यांचे मुंबईत ‘रेड कार्पेट’ स्वागत करण्यात आले. जागोजागी फलकांबरोबरच काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वत: प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे हे तेव्हा उपस्थित होते. राज्यमंत्र्यांच्या स्वागताला प्रसिद्धी मिळेल याचीही खबरदारी घेण्यात आली.
संग्रहित लेख, दिनांक 9th Feb 2013 रोजी प्रकाशित
‘युवराजां’च्या जवळीकीमुळे केंद्रीय राज्यमंत्र्यांना पायघडय़ा!
केंद्रातील काँग्रेसचे अनके बडे मंत्री वा नेतेमंडळी मुंबईत येत असतात. काहींच्या स्वागताचे फलक लागतात तर काहींच्या नशिबी तसे स्वागत नसते. राज्यमंत्री किंवा दुसऱ्या फळीतील नेतेमंडळी आले वा गेले त्यांची कोणी फारशी दखलही घेत नाही. पण केवळ राहुल गांधी यांचे निकटवर्तीय म्हणून केंद्रातील राज्यमंत्र्याचे प्रदेश काँग्रेसच्या वतीने नुकतेच मुंबईत धुमधडाक्यात स्वागत करण्यात आले.
First published on: 09-02-2013 at 04:47 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Closeness with yuvraj limitations on center state minister