आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर प्रदेश समित्यांना दिशा आणि सल्ला देण्याकरिता समित्या गठित कराव्या या राहुल गांधी यांच्या आदेशानुसार राज्यात स्थापन करण्यात आलेल्या समितीत वादग्रस्त ठरलेले मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांना अग्रस्थान देण्यात आले आहे. सर्व जिल्ह्यांमधील प्रभारींची यादी घोषित करण्यात आल्याने प्रदेशाध्यक्षपदी माणिकराव ठाकरे हेच कायम राहणार हे सुद्धा स्पष्ट झाले आहे.
प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्वात बदल होणार अशी गेले अनेक दिवस चर्चा होती. पण बाकीच्या काही राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष बदलले तरीही महाराष्ट्रात बदल करण्यात आला नव्हता. तेव्हाच माणिकराव ठाकरे हे कायम राहणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. आगामी निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर राज्यातील प्रभारींच्या नावांची यादी सरचिटणीस गणेश पाटील आणि प्रवक्ते सचिन सावंत यांनी जाहीर केली.
निवडणुकांसाठी पक्षाला सल्ला आणि दिशा देण्याकरिता आठ सदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली. या समितीत कृपाशंकर सिंग यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असून, डॉ. भालचंद्र मुणगेकर, डॉ. रत्नाकर महाजन, उल्हास पवार आदींना मात्र नंतर स्थान देण्यात आले आहे.
ठाण्यात मुझ्झफर हुसेन तर नवी मुंबईत अंतुले
काँग्रेसने जिल्हावार प्रभारींची नियुक्ती करताना ठाणे शहराची जबाबदारी आमदार मुझ्झफर हुसेन यांच्याकडे कायम ठेवली. मुश्ताक अंतुले (नवी मुंबई), कालिदास कोळंबकर (सिंधुदुर्ग), रोहिदास पाटील (नागपूर), यशवंत हप्पे (कल्याण) यांची निवड झाली आहे.