दिल्लीतील श्रेष्ठींशी चांगले संबंध आहेत, तुम्हाला विधान परिषदेचे तिकीट मिळवून देतो, असे सांगून नागपूर आणि पुणे येथील दोन व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका जोडप्यासह तक्रारदारालाही अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांकडून पाच कोटी दोन लाख रुपयांची रक्कम घेत त्यांना विधान परिषदेचे तिकीट देतो, असे सांगण्यात आले होते. याबाबत मनोज तिवारी याने जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र फसवणूक करणाऱ्या जोडप्याबरोबर त्याचे चांगले संबंध असून या सर्व प्रकरणात त्याचाही हात असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
जुहू येथील सिल्वर बीच को. ऑप. हौ. सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनोज तिवारी याची २०११ मध्ये हितेश झवेरीशी ओळख झाली. दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी आपली चांगली ओळख असल्याचे हितेशने मनोजला सांगितले.
या ओळखीच्या आधारे आपण कोणालाही विधान परिषदेचे तिकीट मिळवून देऊ शकतो, अशी बढाईदेखील त्याने मारली. मनोजने नागपूर येथील विजयकुमार रामचंदानी आणि पुण्यातील विनायक ओगले या दोन व्यावसायिक मित्रांना ही गोष्ट सांगत त्यांच्याकडून पाच कोटी दोन लाख रुपयांची रक्कम घेतली. मनोजने ही रक्कम हितेश झवेरी, पराग शाह आणि त्याची पत्नी जिग्ना शाह यांना दिली.
पराग, जिग्ना आणि हितेश यांना एप्रिल महिन्यातच अटक करण्यात आली होती. मात्र गुन्हे अन्वेषण विभागाने याबाबत अधिक खोलवर तपास केला असता मनोजने ओगले यांच्याकडून तिकीट देण्याच्या बोलीवर २५ लाख रुपये घेतले असल्याचे उघडकीस आले.
पराग, हितेश आणि जिग्ना यांच्या कटात मनोजचाही हात आहे, हे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. न्यायालयाने त्याला २० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 18th Jun 2013 रोजी प्रकाशित
आमदारकीचे आमिष दाखवून गंडविणाऱ्या भामटय़ाला अटक
दिल्लीतील श्रेष्ठींशी चांगले संबंध आहेत, तुम्हाला विधान परिषदेचे तिकीट मिळवून देतो, असे सांगून नागपूर आणि पुणे येथील दोन व्यापाऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी एका जोडप्यासह तक्रारदारालाही अटक करण्यात आली आहे. या व्यापाऱ्यांकडून पाच कोटी दोन लाख रुपयांची रक्कम घेत त्यांना विधान परिषदेचे तिकीट देतो, असे सांगण्यात आले होते.
First published on: 18-06-2013 at 01:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Couple arrested for promising mlc seats to businessman