शैलजा तिवले, लोकसत्ता
मुंबई : मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख उतरता असला तरी पुढील दोन आठवडे महत्त्वाचे आहेत. तसेच उपचाराधीन रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा अधिक असल्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.
मुंबईत डिसेंबरच्या चौथ्या आठवडय़ापासून रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढू लागली. ओमायक्रॉनमुळे आलेल्या तिसऱ्या लाटेमध्ये दैनंदिन रुग्णसंख्येचे यापूर्वीचे सर्व विक्रम मोडीत निघाले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात दैनंदिन रुग्णसंख्या चार दिवसांत दुपटीने वाढली आणि दोन हजारांपेक्षा अधिक झाली. जानेवारीमध्येही संसर्ग प्रसाराचा वेग आणखी वाढला आणि पाच दिवसांतच दैनंदिन रुग्णसंख्या १५ हजारांवर गेली. गेल्या आठवडय़ाच्या शेवटी हा आलेख २० हजारांच्या घरात गेला. परंतु त्यानंतर मात्र काही दिवस रुग्णसंख्येचा आलेख स्थिर होता. ६ ते १० डिसेंबर या काळात रुग्णसंख्या २० हजारांच्या पुढे गेली नाही. सोमवारी तर दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये ३५ टक्क्यांनी घट होऊन ती १३ हजारांपर्यंत कमी झाली. मंगळवारीही रुग्णसंख्येतील घट कायम राहिली असून एका दिवसांत ११ हजार ४६७ रुग्ण आढळले आहेत.
दैनंदिन रुग्णसंख्येमध्ये घट झाली असली तरी तिसरी लाट उताराला लागली, असे म्हणता येणार नाही. पुढील दोन आठवडे रुग्णसंख्येत चढ-उतार होत राहणार. मुंबईत चाचण्या कमी होत असल्या तरी बाधितांचे प्रमाणही ३० टक्क्यांवरून २० टक्क्यांपर्यंत कमी आले आहे. परंतु त्यामुळे बेफिकीर होणे योग्य नाही. उलट येत्या काही दिवसांत शहरात रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण काही प्रमाणात वाढेल. त्या दृष्टीने नियोजन करणे गरजेचे आहे, असे करोना कृतिदलाचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले. मुंबईमध्ये बाधित रुग्णांच्या तुलनेत २१ टक्के रुग्णांना आतापर्यंत रुग्णालयात दाखल केले आहे. परंतु बाधित रुग्णांचे प्रमाण तुलनेने जास्त असल्यामुळे रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांची संख्या टक्केवारीमध्ये कमी दिसत असली तरी प्रत्यक्षात ७,२८३ रुग्ण दाखल आहेत.
सध्या शहरात १ लाख ५२३ रुग्ण उपचाराधीन आहेत. बहुतांश रुग्ण गृह विलगीकरणात असले तरी पुढील काही दिवसांत लक्षणे आल्यामुळे किंवा लक्षणे तीव्र झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे यातील जवळपास पाच हजार रुग्ण रुग्णालयात दाखल होतील असा अंदाज आहे. त्यानुसार आम्ही तयारी केली आहे. खाटांची संख्याही वाढवून ३५ हजारांपर्यंत नेली आहे. तसेच आणखी खाटांची आवश्यकता भासल्यास लसीकरण केंद्रांमध्येही करोना दक्षता केंद्र सुरू करण्याचा विचार करण्यात येत आहे, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.
चाचण्या आणखी वाढविणे गरजेचे
मुंबईत सध्या अनेक बाबींवर निर्बंध लावले आहेत. त्यामुळे गर्दी किंवा वर्दळ काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी येत असली तरी चाचण्यांचे प्रमाण मात्र ६० ते ६२ हजारांच्या पुढे गेलेले नाही. चाचण्या वाढविण्यावरही पालिकेने भर देणे गरजेचे आहे, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केल आहे.
मृत्यूचे प्रमाण काही अंशी वाढण्याची शक्यता
पुढील काही दिवसांमध्ये रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढणार असल्यामुळे मृतांच्या संख्येतही काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यात रुग्णालयात दाखल होणाऱ्यांमध्ये लसीकरण न झालेल्यांचे प्रमाण अधिक असल्यामुळे हा धोकाही आहेच. गेल्या काही दिवसांत दैनंदिन मृतांच्या संख्येत किंचित वाढ झाली आहे. हे प्रमाण वाढले तरी ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव तुलनेने सौम्य असल्यामुळे पहिल्या दोन्ही लाटांच्या तुलनेत निश्चितच कमी असेल, असे मत मृत्यू विश्लेषण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले.