संपाचा इशारा देऊन दिवाळी बोनसची मागणी लावून धरलेल्या बेस्ट कर्मचाऱयांचे गा-हाणे अखेर बेस्ट प्रशासनाने ऐकले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘मातोश्री’वर झालेल्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱयांना पाच हजार रुपयांचा बोनस जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बेस्ट उपक्रमाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने गेल्या काही वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान वा बोनस मिळालेला नाही. यंदा तरी दिवाळी ‘प्रकाशमान’ जावी, यासाठी कर्मचाऱ्यांनी बोनसची मागणी लावून धरली होती. मात्र उपक्रमावर आधीच कर्जाचा डोंगर असून कामगारांचे पगार देण्यासाठीही उपक्रमाला कर्ज काढावे लागते, ही वस्तुस्थिती मांडत बेस्ट प्रशासनाने याबाबत असमर्थता दर्शवली होती. त्यानंतर बेस्ट कामगारांच्या संघटनांनी एकत्र येत कृती समितीच्या माध्यमातून संपावर जाण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, बेस्ट समिती अध्यक्ष अरविंद दुधवडकर यांनी कृती समितीला सकारात्मक निर्णयाच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आश्वासन देत समितीकडे ३ नोव्हेंबपर्यंतचा अवधी मागितला होता. यापार्श्वभूमीवर आज ‘मातोश्री’वर झालेल्या सेना नेत्यांच्या बैठकीत बेस्ट कर्मचाऱयांना पाच हजार रुपयांचा बोनस मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, आधीच आर्थिक डोलारा डळमळीत असलेल्या बेस्ट प्रशासनावर या बोनसच्या घोषणेमुळे अतिरिक्त भार पडणार आहे.
संग्रहित लेख, दिनांक 30th Oct 2015 रोजी प्रकाशित
बेस्ट कर्मचाऱयांना दिवाळी बोनस जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली 'मातोश्री'वर झालेल्या बैठकीत निर्णय
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड

First published on: 30-10-2015 at 15:19 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali bonus to best workers announced