दहशतवादी पोस्टविरोधात ‘युथ की आवाज’च्या सहकार्याने उत्तर शोधणार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समाजमाध्यमांवर प्रक्षोभक विचारांचा प्रसार करून तरुणांना आपल्या जाळ्यात ओढणाऱ्या दशहतवादी संघटनांवर आळा घालण्यासाठी आता फेसबुक आणि युथ की आवाज या संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या विचारांनी प्रभावित झालेल्या तरुणांना त्या विचारापासून परावृत्त करण्यासाठी या दोन्ही संस्था तरुणांच्याच सहकार्याने उपाय शोधत आहे. यासाठी देशभरात ‘डिजिटल मसाला चॅलेंज’ या नावाने हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. यातील सवरेत्कृष्ट कल्पनांना तब्बल पाच हजार डॉलर्सचा निधी देण्यात येणार आहे.

तरुणांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी ‘युथ की आवाज’ ही संस्था गेल्या दोन वर्षांपासून फेसबुकसोबत कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीत समाजमाध्यमावर प्रक्षोभक विचारांचा प्रसार करून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकविणाऱ्या दहशतवादी संघटनांच्या कृत्यात वाढ झाली आहे. यावर उपाय म्हणून या पोस्ट ब्लॉक करण्याचा पर्याय आहे. मात्र इंटरनेट हे जागतिक पातळीवर वापरले जात असून प्रत्येक देशाचे नियम व अटी या वेगवेगळ्या आहेत. यामुळे ते करणे अवघड जाते. यामुळे यावर उपाय काढण्यासाठी फेसबुक आणि युथ की आवाज या संस्थांनी एकत्रित येऊन तरुणांच्या सहकार्याने प्रयत्न सुरू केले.

या निधीचा वापर करून तरुणांनी त्यांनी कल्पना विकसित करायची आहे. तसेच त्यातून तयार झालेल्या उत्पादनाला फेसबुकवर त्यांच्या कल्पनांना विशेष जागा देण्यात येणार आहे. आत्तापर्यंत झालेल्या स्पर्धामध्ये दहशतवादी विचाराने प्रेरित झालेल्या तरुणांना त्या विचारांपासून परावृत्त करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधणारा चॅटबोट तयार करण्याची संकल्पना समोर आली आहे. याचबरोबर आयआयटी कानपूरमध्ये झालेल्या हॅकेथॉनमध्ये विद्यार्थ्यांच्या समूहाने केलेल्या पाहणीत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील तरुण अशा विचारांना पैशांच्या मोहापाई भरीस पडत असल्याचे निदर्शनास आले. यामुळे अशा तरुणांना त्यांच्या भागात किंवा त्यांच्या आसपासच्या परिसरात कोणत्या संधी उपलब्ध आहे याचा तपशील उपलब्ध करून देण्याची संकल्पना समोर आल्याचे युथ की आवाजचे संस्थापक अन्शुल तिवारी यांनी सांगितले. तर काही तरुणांनी अशा तरुणांसमोर चांगली बाजू आणण्यासाठी वेबमालिका सुरू करण्याचा विचारही मांडल्याचे त्यांनी सांगितले. तरुणांच्या या विचारांच्या माध्यमातून पुढील सहा महिन्यांत समाजमाध्यमांवर प्रसारित केल्या जाणाऱ्या दहशतवादी तसेच धर्म किंवा समाजाच्या बाबतीतील कट्टर विचारांचा सामना करणारी सक्षम यंत्रणा उभी राहील असा विश्वासही तिवारी यांनी व्यक्त केला. समाज माध्यमांवरील जबाबदार संस्था म्हणून आम्ही हे आव्हान स्वीकारले असून तरुणांच्या सहकार्याने आम्ही ते यशस्वी करून दाखवू असेही ते म्हणाले.

विजेत्यांना पाच हजार अमेरिकन डॉलर्सचा निधी

तरुणांना यावर विचार करून तोडगा काढण्यासाठी त्यांनी देशभरात विविध ठिकाणी हॅकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. आत्तापर्यंत कानपूर, दिल्ली, गुवाहाटी येथे या हॅकेथॉन पार पडल्या असून शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत पार पडणार आहे. या प्रत्येक शहरातील विजेत्यांना फेसबुकतर्फे पाच हजार अमेरिकन डॉलर्सचा निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook digital masala challenge