देशातील वातानुकूलित आणि अर्ध वातानुकूलित हॉटेल्सवर लावलेल्या सेवाकराच्या निषेधार्थ हॉटेल व्यावसायिकांच्या ‘आहार’ संघटनेने सोमवारी, २९ एप्रिल रोजी राष्ट्रव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला राज्यातील आणि गुजरातमधील हॉटेल्स असोसिएशननेही पाठींबा दिला असून राज्यातील २७ हजार हॉटेल्स बंद राहणार आहेत.
‘इंडियन हॉटेल्स अ‍ॅण्ड रेस्टॉरन्टस असोसिएशन’ (आहार) संघटनेने शुक्रवारी एका पत्रकार परिषदेमध्ये या बंदची माहिती दिली. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये वातानुकूलित हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या बिलावर आणखी १२.६३ टक्के इतका सेवा कर लावण्याच्या घोषणेची अंमलबजावणी १ एप्रिलपासून सुरू झाली आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्या घटून व्यवसायावर परिणाम झाल्याचे हॉटेल चालकांचे म्हणणे आहे.