कल्याण-डोंबिवली महापालिकेला १४० दशलक्ष लिटर अतिरिक्त पाणी पुरविण्यासंदर्भात विधानपरिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्यासमवेत पुढील आठवडय़ात बैठकीचे आयोजन केले जाणार आहे.
मोरबे धरण झाल्यावर नवी मुंबई महापालिकेला बारवी धरणातून दिले जाणारे १४० दशलक्ष लिटर पाणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला द्यायला हवे होते. कल्याण-डोंबिवलीची लोकसंख्या मोठया प्रमाणावर वाढत असताना तेथील नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत असल्याची लक्षवेधी सूचना संजय दत्त यांनी दिली होती. पालकमंत्र्यांनी उच्चाधिकार समितीच्या निर्णयाला डावलून अन्याय्य पाणीवाटप कोणत्या अधिकारात केले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा प्रश्न सोडविण्यासाठी उपसभापतींकडे बैठक घेण्याची सूचना नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनीच केली. या बैठकीस लोकप्रतिनिधींनाही आमंत्रित केले जाणार आहे.