नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी जुहू चौपाटीवर जमलेल्या गर्दीचा फायदा घेत एका मद्यपीने एका विवाहित महिलेचा विनयभंग केला.
 दरवर्षी ३१ डिसेंबरला जुहू चौपाटीवर नववर्षांच्या स्वागतासाठी मोठय़ा संख्येने नागरिक येत असतात. या ठिकाणी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. तसेच सीसीटीव्ही कॅमेरेही लावले होते. यावेळी एक २९ वर्षीय विवाहित महिला पतीसह आली होती. रात्री दीडच्या सुमारास ती चौपाटीवर फिरत असताना गर्दीचा फायदा घेत हैदर अली अजीझ या इसमाने तिच्याशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला. त्या महिलेने त्वरीत आरडाओरडा केला. उपस्थित लोकांनी त्याला बदडत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. हैदर अली मद्याच्या नशेत होता, अशी माहिती सांताक्रुझ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण चव्हाण यांनी दिली.